पुणे जिल्हा | खेडमध्ये आज विविध सामाजिक उपक्रम

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती व खेड आळंदी विधानसभा समन्वयक अमोल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 29) विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमोल पवार यांचे वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यातील प्रत्येक गावांना सार्वजनिक वापरासाठी 5 फूट रुंद व 50 फूट लांब असलेल्या चटईचे एकूण सहा बंडल भेट देण्यात येणार आहेत. चटई वाटपाचा कार्यक्रम संतोषनगर-भाम (ता.खेड) येथे साईकृपा मंगल कार्यालयात 5 वाजता आयोजित केला आहे.
यावेळी जीवन सुंदर आहे या विषयावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते डॉ. गणेश शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच ओम शांती मदर टेरेसा महिला अनाथ आश्रमाला गरजेच्या वस्तू वाटप करून श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथे गोशाळेतील जनावरांसाठी चारा देण्यात येणार आहे. चटई वाटप कार्यक्रमानंतर अमोल पवार यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन कार्यक्रम होणार आहे.
लोकसभा निकाल अवघ्या सहा दिवसांवर आला असून राज्यातील विधानसभा निवडणूक फक्त चार महिन्यांवर आली. खेड-आळंदी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांनी आपले वाढदिवस नागरिकांच्या गर्दीत करण्याचे नियोजन केले जात आहेत.
अमोल पवार यांनी देखील ज्या गावांना सार्वजनिक वापरासाठी चटईची गरज आहे, अशा गावांनी येऊन चटईचे बंडल घेऊन जावेत, असे आवाहन केल्याने तालुक्यातील गावचे लोक मोठ्या प्रमाणात येण्याची दाट शक्यता आहे.





