Nagar | केडगाव मंडलात पावसाच्या आकडेवारीत तफावत

नगर, (प्रतिनिधी) – गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून, नदी, नाले वाहते झाले आहेत. जिल्ह्यात दररोज मुसळधार पाऊस पडत असताना केडगाव येथील मंडलात दोन दिवसांची पावसाची आकडेवारी अचंबित करणारी आहे.
सोमवारी व मंगळवारी केडगावला जोरदार पावसाने झोडपले असताना पर्जन्यमापकावर केवळ ३.८ व ०.३ अशी नोंद झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
प्रकार जिल्ह्याच्या काही मंडळात झाला असून, आकडेवारीत तफावत आढळून येत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार असून, पावसाने झालेल्या नुकसान भरपाइत अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात कमी- अधिक प्रमाणात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने नदी, नाले, ओढे वाहते झाले असून, शेतात पाणी साचून तळे झाले आहे.
अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. नगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. नगर तालुक्यातील चास, नागापूर, वाळकी, चिचोंडी पाटील, सावेडी, केडगाव मंडलात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने पिकांना फायदा झाला असून, विहिरी, तलाव, बंधारे भरल्याने रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सोमवारी रात्री नगर शहरासह केडगावला दोन तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शेतात पाणी साचून ओढे, नाले वाहते झाले. मात्र सोमवारी सकाळी पर्जन्यमापकावर केवळ ३.८ इतकी नोंद झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री पुन्हा जोरदार पाऊस झाला. मंगळवारी सकाळच्या आकडेवारीत केवळ ०.३ इतकी नोंद झाली आहे. वास्तविकत: या दोन दिवसांत केडगावला मुसळधार पाऊस झाला असतानाही पर्जन्यमापकाच्या आकडेवारीतील तफावत अचंबित करणारी आहे.
केडगाव येथे तलाठी कार्यालयात पर्जन्यमापक आहे. या पर्जन्यमापकात अनुक्रमे ५४ व ४५ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. तेथून जवळच असणाऱ्या पाच गोडावून येथील स्वयंचलित केंद्रात ३.८ व ०.३ अशी नोंद झाली आहे.
दोन दिवस झालेल्या पावसाने केडगावला झोडपले असताना आकडेवारीत तफावतीचा फटका नुकसान भरपाइ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना बसू शकतो. त्यातच केडगाव येथील तलाठी कार्यालयातील पर्जन्यमापकाचा काही भाग गायब करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
त्यामुळे पर्जन्यमापकाची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व बाबींची कृषी व महसूल खात्याने दखल घेऊन पावसाची खरी आकडेवारी प्रसिद्ध करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.





