पुणे, {प्रभात वृत्तसेवा] – पुणे स्थानकावरुन लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. पुणे-हुबळी-मिरज-पुणे अशी वंदे भारत एक्स्प्रेस दि. १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मुंबई-कोल्हापूर वंदे भारत सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासूनची होती. मध्य रेल्वेकडून अखेर वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात येत असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हुबळी आणि पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडण्यासाठी ही एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. पुणे ते हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस सोमवार व्यतिरिक्त दररोज धावणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ही पुण्यातून दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे.
मिरज येथे सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचणार असून हुबळी येथे रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. या एक्स्प्रेसला सर्व आठ वातानुकुलित कोच जोडण्यात आले आहेत. तर हुबळी येथून सकाळी ५ वाजता सुटणार असून मिरज येथे सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. तर, दुपारी दीड वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे.
वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहे. पहिली गाडी हुबळी स्थानकावरून पुण्यासाठी सुटणार आहे. अनेक महिन्यांच्या पाठ पुराव्यामुळे ही सेवा सुरु होत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची होणारी गैरसोई आता दूर होणार आहे. – इंदू दुबे, रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग