टोलनाका तोडफोड करणे पडले महागात; मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना अटक

नाशिक – मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर थांबवण्यात आला होता. याप्रकरणी संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मोठा राडा घातला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याप्रकरणी टोल मॅनेजरने तक्रार दिल्यानंतर 15 जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा टोल मॅनेजरने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 14 जणांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यातील आठ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. टोल नाक्यावर अमित ठाकरे यांचा अपमान झाल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. खवळलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी थेट टोल नाकाच फोडला. यासर्व घटनेवर स्वतः अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती.
काय म्हणाले अमित ठाकरे?
अमित ठाकरे म्हणाले… “रात्री साईबाबांचा दर्शन घेतल्यानंतर मला नाशिकला काम असल्याने मी नाशिककडे निघालो. सिक्युरिटी दिवसभर बरोबर असल्याने त्यांना शिर्डीचा थांबायला सांगितलं. कोपरगावहून समृद्धी महामार्गावरुन नाशिककडे निघालो आणि सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटला माझी गाडी थांबवली. गाडीला फास्टॅग असतानाही तो रॉड खाली आला.
तो टोलनाक्याचा काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम होता. माझ्या सहकाऱ्याने ने त्यांना फास्टॅगबाबत विचारलं तर त्यांनी आमचे काही इश्यूज आहेत असं आम्हाला सांगितलं. टोलनाक्यावरील कर्मचारी सुद्धा अत्यंत उद्धट होते. तर मॅनेजरला त्यांनी फोन केला तेव्हा तो सुद्धा तशाच भाषेत बोलत असल्याचं दिसलं.
दहा मिनिटे थांबवल्यावर मला त्या ठिकाणाहून सोडण्यात आलं आणि मी नाशिकला हॉटेलवर पोहोचलो तेव्हा कळलं की टोलनाका फोडण्यात आला आहे. साहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक अॅड झाला..’ असं ते यावेळी म्हणाले.




