Prakash Ambedkar : EVM विरोधात वंचितचा एल्गार; प्रकाश आंबेडकरांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त करून वाढलेल्या मतटक्क्याकडे बोट दाखवत हा जनतेने दिलेला निकाल नाही अशी टीका महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. या पाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. विधानसभेला यंदा वंचित खाते उघडणार होती, परंतु ईव्हीएममुळे खाते उघडता आले नाही, असा आरोपदेखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
वंचितकडून करण्यात आले आवाहन
वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन EVM ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.





