संतोष देशमुखांच्या हत्येवेळी व्हिडिओ कॉलनंतर वाल्मिक कराडचा मुंडेंना फोन; सुप्रिया सुळेंच्या दाव्याने खळबळ

बीड : बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अमानुष छळाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हाच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आजारी असल्याचे कारण देत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या सुरु असताना व्हिडिओ कॉलद्वारे आरोपी एकमेकांशी संपर्कात होते. विशेषतः, विष्णू चाटेचा व्हिडिओ कॉल संपल्यानंतर वाल्मिक कराडने तत्काळ धनंजय मुंडे यांना फोन केला होता, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच पुढे म्हणाल्या, या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करावी. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
हे सर्व भयानक आहे. आज ८४ दिवस झाले आहेत या गोष्टीला. या प्रकरणातल्या चार्जशीटमधील फोटो हे सरकारने आधीच पाहिलेले असणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे सर्व फोटो आधीच पाहिलेले असतील ना. फोटो पाहून या व्यक्तीचा राजीनामा घेण्यासाठी ८४ दिवस लागले, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
धनंजय मुंडेंनी राजीनाम्यात काय म्हटलंय?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे.
माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.





