Supriya Sule : देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मीक कराडच! सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या दोन लोकांनी राज्याची….

मुंबईः संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. वाल्मिक कराडने आवादा कंपनीला खंडनी मागितल्यानंतर झालेल्या वादातून बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. सीआयडीने देशमुख हत्या प्रकरणातील दोषाआरोपत्र दाखल केले असून त्यामध्ये वाल्मिक कराडच्या नावाची पहिली नोंद आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी आणि एसआयटीची स्थापना केली होती. यासंदर्भात सीआयडीने तब्बल 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे समजते.
या प्रकरणात सुरुवातीला खंडणीचा गुन्हा दाखल असलेला आणि आता देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचे समोर आल्यानंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन लोकांनीच राज्याची बदनामी केली आहे. बीडचे लोक साधे आणि सरळ आहेत. परळीचे लोकही साधे आणि सरळ आहेत. पण दोन लोकांनी राज्याची वाट लावली आहे. राज्याची बदनामी केली असल्याचे त्या म्हणाल्या.
कुणी तरी मागे असल्याशिवाय इतका मोठा गुन्हा कराड करूच शकत नाही, असा सवाल उपस्थित करत हा दावा सुळेंनी केला आहे. वाल्मिक कराडचे नाव आरोपपत्रात आल्याचे मला काही आश्चर्य वाटत नाही, असे देखील सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.
आरोपपत्रात हत्येचे कारण नमूद
देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच असल्याचे सीआयडी आणि एसआयटीने केलेल्या तपासातून समोर आले आहे. या हत्या प्रकरणातील सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार पहिला आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडिओ सीसीआयडीकडे आहे. तसेच वाल्मिक कराडला अवादा कंपनीकडून २ कोटी रुपयांची खंडणी घ्यायची होती. पण यामध्ये संतोष देशमुख हे अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आली. हेच हत्येमागचे कारण असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या दोषाआरोप पत्रात म्हटले आहे. घुले, चाटे आणि कराड यांच्यातील संभाषणाचे कॅाल रिकार्डिंग देखील सीआयडीकडे आहे.





