सरपंचाच्या हत्येमागे वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षकाचा हात; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

केज – मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे धनंजय मुंडे यांच्या जवळील वाल्मिक कराड याच्यासह पोलिसांचाही हात असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. पीआय आणि वाल्मिक कराड यांसारख्या लोकांना आरोपी न केल्यास अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी आज मस्साजोग गावात भेट दिली. यावेळी त्यांनी मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तत्पूर्वी त्यांनी बीडचे पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांची भेट घेतली. कोणाच्या राजकीय दबावाला बळी न पडता खून प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई करा, अशा सूचना दानवे यांनी यावेळी दिल्या.
प्रशासन कोणाच्या तरी हाताचे बाहुले बनलेले आहे. पोलिसांनी ठरवले असते, तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता, असे दानवे म्हणाले. परंतु, कानावर आलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पोलिस एकमेकांना मिळालेले आहेत, असा दावा दानवे यांनी केला. इथे काही लोकांची दादागिरी एवढी सुरू आहे की, पोलिस देखील काही करू शकत नाही, अशी स्थिती असल्याचे दानवे म्हणाले.
वाल्मिक कराड यांसारखी मंडळी प्रशासनाला काही समजतच नाही. कुणीही येतो, दादागिरी, हम करे सो कायदा, असे सुरू आहे. यातूनच संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला आहे.
देशमुखांचे अपहरण झाल्यानंतर नातेवाईक पोलिसांकडे गेले असता त्यांनी तक्रार घेतली नाही. तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला साडेतीन तास पोलिस ठाण्यात बसवले. संतोष 15 – 20 मिनिटांत येतील, असे पोलिस सांगत होते. अखेर संतोष देशमुख यांच्या खूनाची बातमी आल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंद करून घेतला, असेही दानवे यांनी सांगितले.





