Ayan Raj Vaibhav Suryavanshi’s Friend : आयपीएल २०२५ मध्ये १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते. या युवा खेळाडूने आपल्या बॅटच्या जोरावर जगभरात आपली ओळख निर्माण केली. राजस्थानकडून खेळताना त्याने टी-२० क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोंदवले होते. आता त्याच्या पावलांवर पाऊल ठेवत त्याच्या मित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बिहारच्या १३ वर्षीय क्रिकेटपटू अयान राजने आपल्या विस्फोटक खेळीने संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.
वयाच्या १३व्या वर्षी ठोकले त्रिशतक –
बिहारसाठी जिल्हा क्रिकेट लीगमध्ये संस्कृती क्रिकेट अकादमीकडून खेळताना अयानने ३२७ धावांची दमदार खेळी साकारली. त्याने ही खेळी ३० षटकांच्या सामन्यात केली आहे. अयानच्या या खेळीत ४१ चौकार आणि २२ षटकारांचा समावेश होता. अयानच्या या खेळीने त्याचे शॉट निवडीचे कौशल्य आणि प्रतिभा सर्वांना दिसून आली. या खेळीदरम्यान त्याने अप्रतिम शैलीत फटके खेळले. अवघ्या १३ वर्षांच्या वयात अशा प्रकारची खेळी करून अयानच्या भविष्यासाठी सकारात्मक संकेत मिळत असल्याचे दिसत आहे.
वैभव सूर्यवंशीप्रमाणे मोठा धमाका करण्याची क्षमता –
अयान राजने ३२७ धावांची खेळी शांतपणे नव्हे, तर स्फोटक शैलीत खेळली. त्याने या धावा २४४ च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या. ३० षटकांच्या या सामन्यात अयानने ३२७ धावा करण्यासाठी १३४ चेंडू घेतले. त्याच्या या खेळीत सर्वाधिक धावा चौकार आणि षटकारांमधून आल्या. यावरून हे स्पष्ट होते की हा खेळाडूही वैभव सूर्यवंशीप्रमाणे टी-२० क्रिकेटमध्ये मोठा धमाका करु शकतो.
हेही वाचा – ICC ODI Ranking : स्मृती मंधाना पुन्हा ठरली नंबर वन! तब्बल सहा वर्षांनंतर वनडेत पटकावलं अव्वल स्थान
कोण आहे अयान राज?
अयान राज हा बिहारमधील मुझफ्फरपूर येथील १३ वर्षीय क्रिकेटपटू आहे, जो वैभव सूर्यवंशीचा जवळचा मित्र आहे. वैभव सूर्यवंशी हा त्याचा प्रेरणास्रोत आहे. अयान आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचे वडील क्रिकेटपटू होते आणि त्यांनी भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले होते, पण ते पूर्ण होऊ शकले नाही. आता अयान भारतीय संघात खेळून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करू इच्छित आहे. यासाठी त्याला त्याच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे.