Vaibhav Suryavanshi Birthday : आंतराष्ट्रीय क्रिकेटसाठी युवा वादळ सज्ज! ICC कडून मिळाला ग्रीन सिग्नल, विराट-रोहितसह गाजवणार मैदान
Vaibhav Suryavanshi Birthday : भारतीय क्रिकेटमधील 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशी याने आज आपला १५ वा वाढदिवस साजरा केला आहे.

Vaibhav Suryavanshi 15th Birthday ICC Eligibility : आयपीएल २०२६ चा पडघम वाजत असतानाच भारतीय क्रिकेटमधील ‘वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशी याने आज आपला १५ वा वाढदिवस साजरा केला आहे. हा वाढदिवस केवळ वैयक्तिक आनंदच नाही, तर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी एक ऐतिहासिक वळण ठरला आहे, कारण आता तो टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात खेळण्यासाठी अधिकृतपणे पात्र झाला आहे.
आयपीएल २०२६ सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी बिहारच्या वैभव सूर्यवंशीने वयाचे १५ वे वर्ष पूर्ण केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमांनुसार, कोणत्याही खेळाडूला वरिष्ठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी किमान १५ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये लागू करण्यात आलेल्या या नियमाची अट वैभवने आज पूर्ण केल्यामुळे आता त्याचे भारतीय संघात पदार्पण करण्याचे स्वप्न सत्यात उतरू शकते.
आयपीएल २०२५ मधील तो ऐतिहासिक धमाका!
🚨 BREAKING 🚨
सिर्फ 15 साल… और सपनों की उड़ान शुरू 🚀
Happy Birthday, Vaibhav Suryavanshi 🎂
अब officially India के लिए खेलने के लिए eligible, इतनी कम उम्र में इतना बड़ा मुकाम! 🇮🇳
ये सिर्फ birthday नहीं… ये future superstar के rise की शुरुआत है 🔥
Vaibhav Suryavanshi
आज… pic.twitter.com/TzG0nMC3Zt— Choupal Buzz (@ChoupalBuzz) March 27, 2026
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सर्वांना थक्क केले होते. फ्रँचायझीने त्याच्यावर १.१ कोटी रुपयांची बोली लावली होती. या विश्वासाला सार्थ ठरवत वैभवने केवळ दुसऱ्याच सामन्यात ३५ चेंडूत झंझावाती शतक ठोकून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. त्याच्या या खेळीने तो केवळ वयोगटातील क्रिकेटपुरता मर्यादित नसून वरिष्ठ स्तरावरही वर्चस्व गाजवू शकतो, हे सिद्ध केले होते.
टीम इंडियात एन्ट्री कधी?
२०२६ च्या अंडर-१९ विश्वचषकातील दमदार कामगिरी आणि रणजी ट्रॉफीतील सातत्यामुळे निवडकर्ते त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. सध्या भारतीय कसोटी संघ संक्रमणाच्या स्थितीत असल्याने, आगामी घरगुती सत्रानंतर वैभवला वरिष्ठ संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. २०२८ चे ऑलिम्पिक आणि आगामी टी-२० विश्वचषक पाहता, वैभव भारताचा ‘एक्स-फॅक्टर’ ठरू शकतो.
वयाची अट पूर्ण झाल्यामुळे आता आयपीएल २०२६ मधील त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. जर त्याने या हंगामातही आपली जादू कायम ठेवली, तर लवकरच तो टीम इंडियाच्या निळ्या किंवा पांढऱ्या जर्सीत मैदानात दिसू शकतो.





