Vaibhav Sooryavanshi : दिग्गज खेळाडूंना ‘जे’ जमलं नाही ‘ते’ वैभवने करून दाखवलं; असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज
आयपीएल २०२६ चा हंगाम क्रिकेट जगतात एका नव्या युगाची सुरुवात करणारा ठरला आहे. या संपूर्ण स्पर्धेत जर कुठल्या एका नावाची सर्वात जास्त चर्चा झाली असेल, तर ते नाव म्हणजे बिहारचा अवघा १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi)

Vaibhav Sooryavanshi : आयपीएल २०२६ चा हंगाम क्रिकेट जगतात एका नव्या युगाची सुरुवात करणारा ठरला आहे. या संपूर्ण स्पर्धेत जर कुठल्या एका नावाची सर्वात जास्त चर्चा झाली असेल, तर ते नाव म्हणजे बिहारचा अवघा १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi).
राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या या डाव्या हाताच्या फलंदाजाने मैदानावर असे काही वादळ आणले की, क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज खेळाडू अवाक झाले आहेत. ज्या कामगिरीसाठी अनेक खेळाडूंना संपूर्ण कारकीर्द घालवावी लागते, ती अद्भूत कामगिरी वैभवने (Vaibhav Sooryavanshi) आपल्या पहिल्याच हंगामात करून दाखवली आहे.
क्रिकेट रसिकांनी २०११ मध्ये ख्रिस गेलची विध्वंसक फलंदाजी पाहिली, २०१६ मध्ये विराट कोहलीचे ऐतिहासिक ९७३ धावांचे वादळ अनुभवले आणि २०२१ मध्ये ऋतुराज गायकवाडचा संयम पाहत त्याला ऑरेंज कॅप आणि ‘इमर्जिंग प्लेयर’चा पुरस्कार पटकावताना पाहिले. परंतु, या सर्वांच्या पुढे जात वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) यंदाच्या एकाच हंगामात एकापेक्षा एक पुरस्कार तर पटकावलेच, पण आयपीएलच्या इतिहासातील अनेक मोठे विक्रम मोडीत काढले.
२३८ चा अविश्वसनीय स्ट्राईक रेट आणि ऑरेंज कॅप!
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये ज्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला, तो आजवरच्या आयपीएल इतिहासातील कोणत्याही फलंदाजाला जमलेला नाही. विराट कोहलीने जेव्हा २०१६ मध्ये ९७३ धावा केल्या होत्या, तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट १५२.०३ होता. डेव्हिड वॉर्नरने १५१.४२ च्या स्ट्राईक रेटने ८४८ धावा केल्या होत्या, तर जोस बटलरने २०२२ मध्ये १४९.०५ च्या स्ट्राईक रेटने ८६३ धावा कुटल्या होत्या. शुभमन गिलने देखील १५७.८० च्या स्ट्राईक रेटने ८९० धावा केल्या होत्या.
वैभवने या दिग्गज फलंदाजांच्या तुलनेत धावा जरी कमी केल्या असल्या, तरी त्याचा प्रभाव थक्क करणारा होता. त्याने यंदाच्या हंगामात ७७६ धावा चोपल्या आणि ऑरेंज कॅपवर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, या धावा त्याने २३८ च्या अंगावर येणाऱ्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत, जो आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात ५०० हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सर्वोच्च आहे.
साई सुदर्शनचा रेकॉर्ड मोडीत, सर्वात युवा ‘ऑरेंज कॅप’ विजेता
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी ऑरेंज कॅप जिंकून वैभवने इतिहास रचला आहे. तो आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप जिंकणारा जगातील सर्वात युवा खेळाडू ठरला आहे आणि हा विक्रम भविष्यात मोडीत निघणे जवळपास अशक्य मानले जात आहे. गेल्या हंगामात गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने शुभमन गिलचा रेकॉर्ड मोडत सर्वात युवा ऑरेंज कॅप विजेता बनण्याचा बहुमान मिळवला होता.
मात्र, वैभवने आता तो रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यासोबतच, २०२२ मध्ये ८६३ धावा करणाऱ्या जोस बटलरनंतर राजस्थान रॉयल्ससाठी ऑरेंज कॅप जिंकणारा वैभव हा केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे.
अवघ्या ४४० चेंडूत १००० धावा आणि ख्रिस गेलचा ‘तो’ महाविक्रम फस्त!
वैभव सूर्यवंशीने या हंगामात केवळ धावाच केल्या नाहीत, तर टी-२० क्रिकेटचे व्याकरणच बदलून टाकले. त्याने आयपीएल कारकिर्दीतील आपल्या पहिल्या १००० धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अवघ्या ४४० चेंडूंमध्ये त्याने १००० धावांचा टप्पा पार केला असून, तो आयपीएलमध्ये सर्वात जलद १,००० धावा करणारा फलंदाज बनला आहे.
याशिवाय, एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा वर्षानुवर्षांचा विक्रम वैभवने निकालात काढला आहे. ख्रिस गेलने एकाच हंगामात सर्वाधिक ५९ षटकार खेचण्याचा विक्रम केला होता. वैभव सूर्यवंशीने या हंगामात आपल्या बॅटचा तडाखा दाखवत तब्बल ७२ गगनचुंबी षटकार ठोकले आणि गेलला मागे टाकत या यादीत अव्वल स्थान पटकावले.
थोडक्यात सांगायचे तर, आयपीएल २०२६ हा हंगाम १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Sooryavanshi) नावानेच ओळखला जाईल. त्याने आपल्या आक्रमक आणि कौशल्याने भरलेल्या फलंदाजीने केवळ राजस्थान रॉयल्सलाच नव्हे, तर जागतिक क्रिकेटला एक नवा सुपरस्टार मिळवून दिला आहे.






