Vaibhav Sooryavanshi Captain : युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीचे नशीब चमकले! थेट संघाच्या कर्णधारपदी झाली निवड
Vaibhav Sooryavanshi Captain : २०२६-२७ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बिहारचा १७ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी वैभव सूर्यवंशीची बिहार संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Vaibhav Sooryavanshi Named Bihar Captain For Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६-२७ च्या पहिल्या दोन सामन्यांसाठी बिहार क्रिकेट असोसिएशनने (BCA) १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात मोठा बदल करत बिहारने युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. वैभव पहिल्यांदाच बिहारच्या वरिष्ठ संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर अष्टपैलू सूरज कश्यपची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत बिहारचा पहिला सामना १४ नोव्हेंबरला सौराष्ट्रविरुद्ध, तर दुसरा सामना १६ नोव्हेंबरला रेल्वेविरुद्ध रंगणार आहे.
टीम इंडियाकडून न्यूझीलंड दौऱ्यावर दाखवली होती चमक –
नुकत्याच पार पडलेल्या भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत वैभव सूर्यवंशी भारतीय संघाचा भाग होता. यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन दुखापतग्रस्त झाल्यानंतर वैभवला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळाल्यावर अपयशी ठरल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात त्याने अभिषेक शर्मासोबत डावाची सलामी देत आक्रमक फलंदाजी केली होती; मात्र त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले होते. इशान किशन तंदुरुस्त झाल्यानंतर त्याला संघाबाहेर बसावे लागले होते.
१४ नोव्हेंबरपासून टी-२० स्पर्धेचा थरार; अनमोलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी
Vaibhav Sooryavnshi has been appointed to his first senior captaincy role at the age of just 15 🫡
Details: https://t.co/snN0NycV4y https://t.co/0NvNQEDm8a
— Cricinfo (@cricinfo) November 6, 2026
JUST 15 AND ALREADY A CAPTAIN🧢
Vaibhav Sooryavanshi has been appointed Bihar’s captain for the opening two matches of the upcoming Syed Mushtaq Ali Trophy 2026-27. https://t.co/oHLY3rwHlS
— CricTracker (@Cricketracker) November 6, 2026
देशांतर्गत टी-२० क्रिकेटमधील प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’ १४ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत बिहारच्या संघात अनमोल कुमारकडे यष्टीरक्षकाची भूमिका सोपवण्यात आली आहे. गतवर्षी वैभव सूर्यवंशी बिहारच्या रणजी संघाचा उपकर्णधार राहिला होता; मात्र चालू हंगामात राष्ट्रीय संघाच्या कर्तव्यावर असल्याने तो रणजी करंडकाच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकला होता. आता देशांतर्गत मैदानात कर्णधार म्हणून तो कशी छाप पाडतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
पहिल्या दोन सामन्यांसाठी बिहारचा १७ सदस्यीय संघ : वैभव सूर्यवंशी (कर्णधार), सूरज कश्यप (उपकर्णधार), अनमोल कुमार (यष्टीरक्षक), आलोक कुमार, आयुष लोहारुका, अल्तिमिश अशरफ, तरुण कुमार सिंह, मयंक कुमार, रघुवेंद्र प्रताप, आशिष कुमार, वासुदेव प्रसाद, पृथ्वी राज, मोहम्मद इजहार, अमोद यादव, प्रशांत सिंह, नवाज खान, हिमांशू सिंह.





