Vaibhav Sooryavanshi Sixes : दोन सामन्यांत तब्बल ३१ षटकार! श्रीलंकेविरुद्ध वैभवच्या वादळी खेळीने फायनलपूर्वीच पाकिस्तानच्या गोटात भरली धडकी
Vaibhav Sooryavanshi Sixes : एशिया कप रायझिंग स्टार्सच्या पहिल्या उपांत्य सामन्यात वैभव सूर्यवंशीने श्रीलंकेविरुद्ध २७ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या.

Vaibhav Sooryavanshi smashes 40 off 27 balls against Sri Lanka : आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६ च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध इंडिया-ए च्या डावाची सुरुवात करताना युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत विरोधी गोटात खळबळ उडवली. १४८.१५ च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने अवघ्या २७ चेंडूंत ४० धावा फटकावल्या, ज्यात चार चौकार आणि तीन गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. अखेर जेनिथ लियानागेच्या चेंडूवर लासिथ क्रूसपुलेने त्याचा झेल टिपला आणि ही तुफानी खेळी थांबली.
वैभवच्या धडाकेबाज फॉर्ममुळे पाकिस्तानची वाढली धाकधूक –
बाद होण्यापूर्वी वैभवने ज्या वेगाने धावा जमवल्या, त्यातून त्याने स्पष्ट संकेत दिले की, जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि समोर पाकिस्तानचे आव्हान असले, तर हे वादळ त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. वैभवच्या या घातक फॉर्ममागे त्याचा मागील सामना कारणीभूत आहे. त्या सामन्यात त्याने यूएईविरुद्ध अवघ्या ५३ चेंडूंत २८ षटकार आणि सात चौकारांसह २०४ धावांची ऐतिहासिक खेळी साकारून सर्वांनाच थक्क केले होते.
अवघ्या दोन सामन्यांत ठोकले तब्बल ३१ षटकार –
Vaibhav and the art of making a big hit look effortless! 💙
Watch Sri Lanka A v India A, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.
#SonySportsNetwork #SonyLIV #DPWorldAsiaCupRisingStarsMens2026 https://t.co/x4V3er8lxl
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) November 26, 2026
यूएईविरुद्धच्या त्या विस्फोटक द्विशतकी खेळीत मारलेले २८ षटकार आणि आता श्रीलंकेविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये ठोकलेले तीन षटकार एकत्र केल्यास, अवघ्या दोनच सामन्यांत वैभव सूर्यवंशीच्या नावावर तब्बल ३१ षटकारांची नोंद झाली आहे. मैदानात उतरताच सातत्याने षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या या युवा सलामीवीराची सध्याची लय पाहून कोणत्याही विरोधी संघाच्या गोलंदाजी आक्रमणाला घाम फुटणे निश्चित मानले जात असून, सर्वत्र त्याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.
अंतिम सामन्यात पाकिस्तानशी जुना हिशोब चुकता करण्याची संधी –
वैभवच्या या धमाकेदार कामगिरीमुळे स्पर्धेच्या साखळी फेरीतील आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. साखळी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध वैभव मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता आणि अत्यंत स्वस्तात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. आता जर जेतेपदाच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले, तर साखळी फेरीतील त्या अपयशाचा संपूर्ण हिशोब चुकता करण्याची सुवर्णसंधी वैभव सूर्यवंशीकडे असणार आहे.





