वडगाव शेरी : वाढलेले मतदान कोणाला फायद्याचे?

पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदान संघात वाढलेले नवमतदारांच्या संख्येमुळे यंदाच्या निवडणुकीत 55.71 एवढे मतदान झाले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी 11 टक्क्यांनी वाढली आहे.
सर्वच ४४८ मतदान केंद्रांवर बेव कास्टिंगद्वारे सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच होता. व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले. मतदार संघात ५ लाख ३ हजार ५३९ मतदार आहेत. यात पुरुष-२ लाख ५९ हजार ४५३, महिल-२ लाख ४३ हजार ९८४, ट्रान्सजेंडर मतदार १०२ आहेत. सन २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा ४६ हजार ५४१ मतदार वाढले आहेत. येथे २०१९ मध्ये ४६.९७ टक्के मतदान झाले होते.
मतदार संघात सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत टप्प्या-टप्प्याने बहुसंख्य मतदान केंद्रांवर मतदारांचा रांगा होत्या. त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत गर्दी कमी होती. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मतदारांच्या रांगा पुन्हा वाढल्या. प्रामुख्याने झोपडपट्टी भागांतील मतदान केंद्रांवर दिवसभरच गर्दी होती. वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर, मुंढवा, कल्याणीनगर, वाघोलीचा काही भाग, लोहगाव, साठेवस्ती या भागांत उत्स्फूर्त मतदान झाल्याचे दिसून आले.
धानोरी येथील नारायण गेनबा मोझे शाळा, न्युरान लॅब्स स्कूल, कै.बाबुराव माधवराव टिंगरे विद्यालय, भैरवनगरमधील कै. वसंतराव आनंदराव टिंगरे विद्यालय, विश्रांतवाडी येथील विठ्ठलराव गाडगीळ विद्यालय, जनता हायस्कूल, कस्तुरबा हौसिंग सोसायटी, कळस येथील सिताराम देवकर शाळा, दी ट्रीनीटी स्कूल, टिंगरेनगर येथील कै. गेनबा सोपान मोझे विद्यालय, सरस्वती विद्यालय, पुणे इंटरनॅशनल स्कूल, येरवडा येथील गेनबा सोपानराव मोझे शाळा.
डॉ. आंबेडकर महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण शाळा, नेताजी सुभाषचंद्र भोस, फुलेनगर येथील रश्मी स्कूल, अग्रसेन शाळा, रामवाडी येथील सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर माध्यमिक विद्यालय, चंदननगरमधील श्री. संत तुकाराम माध्यमिक विद्यालय, कै. हंबीरराव कृष्णराव मोझे विद्यालय, खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालय या केंद्रांवर मतदारांची गर्दी सायंकाळपर्यंत होती. काही केंद्रांवर आकर्षक रांगोळ्या काढत सजावटही करण्यात आली होती. सखी मतदान केंद्रही उभारण्यात आले होते. मतदारांच्या लहान मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था होती. वैद्यकीय सुविधाही उभारण्यात आल्या होत्या.
वेळ – झालेले मतदान (टक्केवारी)
७ ते ९ – ६.३७
९ ते ११ – १५.४८
११ ते १ – २६.६८
१ ते ३- ३८.८३
३ ते ५ – ५०.४६
६ सायं – ५५.७१





