Vadgaon Mawal : पोटोबा महाराजांची पालखी सांगवीत पोहचली; शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम
Vadgaon Mawal : वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज आणि सांगवीची श्री जाखमाता देवी यांच्यातील बहीण-भावाचे नाते; इंद्रायणी नदीकाठी पारंपरिक विधींनी पडली भेट.

Vadgaon Mawal – ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज आणि सांगवीचे ग्रामदैवत श्री जाखमाता देवी यांचा महाशिवरात्रीनिमित्त होणारा पारंपरिक भाऊ-बहीण भेटीचा सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. पोटोबा महाराज व जाखमाता देवी यांचे भाऊ-बहीणीचे नाते मानले जात असून, ही परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे.
रविवारी (दि. १५) श्री पोटोबा महाराजांची पालखी भजन व अभंगांच्या गजरात सांगवी येथील इंद्रायणी नदीकाठी असलेल्या जाखमाता देवीच्या भेटीसाठी नेण्यात आली. यावेळी सांगवी ग्रामस्थांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले. देवस्थानचे विश्वस्त आणि ग्रामस्थांच्या हस्ते इंद्रायणी नदीमध्ये पोटोबा महाराजांच्या मूर्तीचे स्नान घालून पोटोबा महाराज व जाखमाता देवीची पारंपरिक भेट घडविण्यात आली.
तसेच देवीची साडी-चोळी व ओटी भरून पूजा करण्यात आली. या सोहळ्यास पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, तुकाराम काटे, अरुण चव्हाण, सुभाषराव जाधव, भास्करराव म्हाळसकर, बबनराव भिलारे, पंढरीनाथ भिलारे,
महादू खांदवे, विठ्ठलराव ढोरे, मधुकर पानसरे, शंकरराव पगडे, सोमनाथ काळे, अनिल कोद्रे, पुजारी अशोक गुरव, शरद गुरव, कैलास खांदवे, रवींद्र म्हाळसकर, नारायण ढोरे, दिनेश तुमकर, सोपान आगळमे, मधुकर टकले, रवींद्र तुमकर, योगेश ढोरे, भाऊसाहेब ढोरे, बाळासाहेब तुमकर आदी उपस्थित होते.
पुरातन महादेव मंदिरात अभिषेक
वडगाव येथील पुरातन महादेव मंदिरात देवस्थान विश्वस्तांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. तसेच पेशवेकालीन तळ्याजवळील ओंकारेश्वर मंदिरात सोमनाथ धोंगडे यांच्या हस्ते अभिषेक पार पडला. यावेळी जोतिबा भजनी मंडळ इंदोरी, पोटोबा महाराज भजनी मंडळ व काकड आरती भजनी मंडळ वडगाव यांच्या भजन कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला. दोन्ही मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.





