वडगाव मावळ – नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यादृष्टीने नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मतदार जनजागृती उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवायला सुरुवात केली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये, बस स्थानके, बाजारपेठा आणि गर्दीची सार्वजनिक ठिकाणी सक्रीय जनजागृती करण्यात येत आहे. निवडणूक प्रशासनाकडून नागरिकांच्या थेट भेटी घेत मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले जात आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना, युवकांना आणि पहिल्यांदाच मतदान करणार्या मतदारांना लोकशाहीतील त्यांच्या सहभागाचे महत्त्व पटवून देण्यावर भर दिला जात आहे. मतदार जनजागृतीसाठी शहरात फिरणारी एलइडी स्क्रीन व्हॅन विशेष आकर्षण ठरत आहे. या व्हॅनद्वारे मतदान प्रक्रियेची माहिती, मतदानाची तारीख, ओळखपत्रांबाबत आवश्यक सूचना, मतदान केंद्रांची माहिती तसेच मत न केल्यास होणाऱ्या तोट्याचे पटवून देणारे लघुपट आणि संदेश दाखवले जात आहेत. बाजारपेठा, चौक, बसस्थानक, सार्वजनिक रस्त्यांवर या व्हॅनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जागरूकता अभियान अधिक प्रभावीपणे पोहोचत आहे. शहरातील नागरिकांनी मतदानाद्वारे लोकशाहीला बळ देणे ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला लोकशाही हक्क बजावणे गरजेचे आहे, म्हणुन मावळ शहरात निवडणूकपूर्व वातावरणात मतदार जागरूकतेची मोहीम जोर धरत असून, ही मोहिम संपूर्ण शहरात केंद्रस्थानी ठरत आहे. युवकांमध्ये मतदानाबाबत उत्सुकता मावळातील तरुणांचा मोठा वर्ग प्रथमच मतदान करणार आहे. त्यामुळे या युवकांना लोकतांत्रिक प्रक्रियेबाबत सजग करण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत. महाविद्यालय परिसरात संवाद सत्रे, मतदार नोंदणी आणि नाव पडताळणी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. आगामी दिवसांत आणखी उपक्रम राबविणार निवडणुक जनजागृती मोहिमेची व्याप्ती आणखी वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या काही दिवसांत मतदार जागरूकता रॅली, हस्ताक्षर मोहिम, माहितीपर व्हिडिओ प्रदर्शन, विद्यार्थी आणि नागरिक संवाद उपक्रम, स्वच्छ आणि निर्भय मतदानाचे संदेश देणारे कार्यक्रम, मतदान जनजागृती पोस्टर स्पर्धा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.