Vadgaon Maval: वडगाव पुन्हा संकटाच्या उंबरठ्यावर; संरक्षण भिंत अजूनही ढासळलेलीच
Vadgaon Maval: मुसळधार पावसाने व्यापाऱ्यांमध्ये भीती, नगरपंचायतीविरोधात संताप

वडगाव मावळ– पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर पूरस्थिती रोखण्यासाठी नगरपंचायतीने केलेली आश्वासने अद्याप कागदावरच राहिल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वडगाव शहरातील मुख्य ओढ्याची पाणीपातळी पुन्हा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली असून, कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या महापुराने वडगावच्या मुख्य बाजारपेठेला मोठा फटका बसला होता. अनेक दुकानांमध्ये कमरेएवढे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. व्यापारी अजूनही त्या नुकसानीतून सावरले नसतानाच पुन्हा पावसाने जोर धरल्याने त्यांच्यासमोर नव्या संकटाची चाहूल लागली आहे.
पुरामध्ये दत्त नगरी परिसरातील ओढ्याची संरक्षण भिंत आणि लोखंडी कठडे पूर्णपणे कोसळले होते. घटनेनंतर नगरपंचायतीचे अधिकारी आणि पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणी झाली, पंचनामे झाले, तातडीने दुरुस्तीचे आश्वासनही देण्यात आले. मात्र पंधरा दिवस उलटूनही प्रत्यक्षात दुरुस्तीचे कोणतेही काम सुरू झालेले नाही.
सध्या ओढ्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळलेला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास पाणी पुन्हा बाजारपेठ आणि लगतच्या वस्त्यांमध्ये शिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते प्रशासनाने वेळेत गाळ काढला असता आणि संरक्षण भिंतीची दुरुस्ती केली असती, तर संभाव्य धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला असता.
दत्त नगरी परिसर हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, शासकीय कार्यालये, बँका आणि विविध व्यावसायिक आस्थापना असल्याने दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. तुटलेली संरक्षण भिंत आणि उघडा ओढा यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह
स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या पुरात लाखो रुपयांचे नुकसान झाले. माल खराब झाला, व्यवसाय ठप्प झाला. त्यानंतर प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा त्याच संकटाचा सामना करावा लागण्याची वेळ आली आहे.
नागरिकांनी नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रत्येक वेळी पूर आल्यानंतर पाहणी, आश्वासने आणि बैठका होतात, पण प्रत्यक्ष काम मात्र होत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
Turbid Water : गढूळ पाणीपुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर





