Vadgaon Maval : अनेक उमेदवारांची स्वप्नपूर्ती अधुरीच

वडगाव मावळ – तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणांची यादी सोमवारी (दि. १३) जाहीर करण्यात आली. या आरक्षण सोडतीने तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलले असून, अनेक इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फिरल्याचे दिसून आले आहे.
पूर्वी तालुक्यातील अनेक नेते आणि इच्छुक उमेदवार आपल्या मतदार संघ आणि वैयक्तिक मतदारांशी सतत संपर्क ठेवत, आपल्या राजकीय भविष्याची आखणी करत असत. अनेकांनी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
स्थानिक महिला मतदारांसाठी कार्यक्रम आयोजित केले, पैठणीसारख्या साड्या वाटल्या, युवकांसाठी सफरी, वयोवृद्धांसाठी आरोग्य शिबिरे आणि शालेय साहित्य वितरणासह विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले. काही गावांमध्ये मोठमोठी बक्षीसे लावून क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या, जेणेकरून लोकांच्या मनात भविष्याचे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे उमेदवार म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होईल.
परंतु झालेल्या आरक्षण सोडतीने या सर्व प्रयत्नांवर थेट परिणाम झाला. तालुक्यातील जिल्हा परिषद पाच गटांमध्ये विभागली गेली आहेत. या गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) आणि भारतीय जनता पक्षाचे काही इच्छुक उमेदवार जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष पदाची स्वप्न पाहत होते. मात्र आरक्षणानंतर अनेक इच्छुकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
निराशा आणि राजकीय फेरबदल
आरक्षणामुळे मावळ तालुक्यातील दीड ते दोन डझन नेत्यांना राजकीय सन्यास घेण्याची वेळ आली आहे. काहींना मनात नसतानाही आपल्या पत्नी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची वेळ आली. काहींना आपल्या सहकारी मित्रांना, पक्षातील सहकाऱ्यांना मदत करण्याची वेळ आली. हे निर्णय फक्त राजकीयच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या देखील मोठा फटका ठरले आहेत.
राजकीय समीकरणांवर परिणाम
आरक्षण जाहीर झाल्यानंतर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, पक्षाचे नेते शिफारसीसाठी सक्रिय आहेत आणि राजकीय गटांमध्ये रणनीती आखण्याचा ताण आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटांमध्ये मतांची चुरस होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः महिला आरक्षणामुळे अनेक नवीन उमेदवारांना संधी मिळाली आहे.





