प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीवर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या आहेत. मात्र अनेक हरकती अर्ज रहिवासी पुराव्यांशिवाय दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहेत. अशा अपूर्ण अर्जांची विना कार्यवाही निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली आहे.प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवरील हरकती व सूचना सादर करण्यासाठी सोमवार (दि. १३) पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्यानंतर मुदत वाढवून शुक्रवार (दि. १७) पर्यंत करण्यात आली. त्यामुळे आणखी हरकती दाखल होण्याची शक्यता आहे.मात्र प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की अनेक अर्ज अपूर्ण आहेत आणि त्यासोबत आवश्यक रहिवासी पुरावे सादर केलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी हरकत अर्ज सादर करताना परिपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी केले आहे. नियमांनुसार, अर्धवट किंवा अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.