Vadgaon Maval: जुने वाद विसरले, आपुलकीचे सोने लुटले! मावळात दसऱ्याचा उत्साह शिगेला
Vadgaon Maval : ढोल-ताशांचा गजर, देवीच्या मिरवणुका अन् सीमोल्लंघनाची परंपरा; गावोगावी भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सव आणि दसरा उत्साहात साजरा

वडगाव मावळ – भक्तीचा जागर, ढोल-ताशांचा निनाद, आपट्याच्या पानांचे सोने आणि माणसामाणसांतील नात्यांना नव्याने उजाळा देणारी गळाभेट… अशा मंगलमय वातावरणात मावळ तालुक्यात नवरात्रोत्सव आणि दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दसऱ्याच्या निमित्ताने गावोगावी सीमोल्लंघनाची परंपरा जपत नागरिकांनी आपसातील जुने वाद विसरून एकमेकांची गळाभेट घेतली. आपट्याची पाने देत ‘सोने घ्या, सोने द्या’ म्हणत शुभेच्छांची देवाणघेवाण केली. परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर संगम या सणाच्या निमित्ताने पाहायला मिळाला.
मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी घटस्थापना करण्यात आली होती. देवीच्या आराधनेसह प्रवचन, कीर्तन, कथा, जागर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीच्या प्रतिमा आणि घटांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. काही गावांमध्ये पालखी, छबिना आणि देवाच्या शासनकाठीची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात या मिरवणुकांनी उत्सवाची रंगत वाढवली.
सीमोल्लंघनातून जपला स्नेहाचा वारसा!
दसऱ्याचे खरे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे सीमोल्लंघनानंतर होणारी आपुलकीची भेट. गावच्या सीमेवर जाऊन सीमोल्लंघन केल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिरात आपट्याची पाने अर्पण केली. त्यानंतर एकमेकांना आपट्याची पाने देत ‘सोने घ्या, सोने द्या’ म्हणत शुभेच्छा दिल्या.
अनेक ठिकाणी जुने मतभेद बाजूला ठेवून नागरिकांनी एकमेकांची गळाभेट घेतली. अबालवृद्धांसह तरुणांनीही या परंपरेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. केवळ आपट्याची पाने देणे नव्हे, तर मनातील कटुता दूर करून नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याचा संदेश या परंपरेतून देण्यात आला.
बाजारपेठा गजबजल्या; वाहन खरेदीलाही पसंती
दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. दुकाने आकर्षक रोषणाई, फुलांच्या माळा आणि रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजवण्यात आली होती. मिठाई, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली होती. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या दालनांमध्येही खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. काहींनी नवीन वाहनांचे आरक्षण केले, तर काहींनी शुभमुहूर्तावर नवीन वाहने घरी आणून त्यांचे पूजन केले.
शेतात अवजारांची पूजा; घराघरांत पुरणपोळीचा गोडवा
दसरा हा शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचा सण ठरला. शेतकऱ्यांनी शेतीची अवजारे आणि शेतजमिनीचे पूजन करून चांगले पीक, भरभराट आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. शेतांमध्ये आंब्याच्या डहाळ्या लावून पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्यात आला. घराघरांत पुरणपोळीचा नैवेद्य तयार करण्यात आला होता.
एकीकडे धार्मिक उत्साह, दुसरीकडे बाजारपेठांतील खरेदीची धामधूम आणि त्याचबरोबर जुने वाद विसरून नाती जपण्याची परंपरा… अशा उत्साही वातावरणात मावळ तालुक्यातील नवरात्रोत्सव आणि दसरा सण आनंदात संपन्न झाला. सीमोल्लंघनाच्या निमित्ताने मावळवासीयांनी आपुलकी, एकोपा आणि सामाजिक सलोख्याचे सोनेच एकमेकांना दिले.
Pune District : कनेरसर-पाबळ रस्त्यासाठी ११.४० कोटींची मान्यता





