वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील उर्से गावात घडलेल्या बालिकेवरील अमानुष अत्याचार व खुनाच्या घटनेविरोधात संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. उर्से बालिकेच्या अत्याचार-खुनातील आरोपीला फाशी द्या या ठाम मागणीसाठी मावळ बंद पुकारण्यात आला, या बंदला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. वडगाव फाट्यावरही आंदोलन झाले. सकाळपासूनच उर्से, तळेगाव दाभाडे, कडधे, सोमाटणे, कामशेत आदी भागांमध्ये दुकाने, बाजारपेठा व खासगी आस्थापने बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी ग्रामस्थ, सामाजिक संघटना आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. बंद दरम्यान ठिकठिकाणी घोषणाबाजी करत निषेध मोर्चे काढण्यात आले. बालिकांना न्याय मिळालाच पाहिजे, गुन्हेगारांना पाठीशी घालू नका अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांचे म्हणणे होते की अशा क्रूर घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून याला आळा घालण्यासाठी कडक शिक्षा आवश्यक आहे. या आंदोलनाच्या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे उपस्थित राहिले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या शांतपणे ऐकल्या. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासन आणि प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंद शांततेत पार पडला असून, प्रशासन आणि न्यायालयाने या प्रकरणात तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मावळकरांनी व्यक्त केली.