प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – वडगांव नगरपंचायतीने तयार केलेला विकास आराखडा हा बिल्डर धार्जिणा त्याचप्रमाणे स्थानिक शेतकरी, गावकरी, जमीनमालक, धार्मिक प्रार्थना स्थळांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप करत हा विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी वडगांव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे. यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे , वडगांव नगरपंचायत निवडणुकीचे भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते अविनाश बवरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, भाजपा नेते अरुण चव्हाण, वडगांव नगरपंचायत भाजपा युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार ॲड.मृणाल म्हाळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच सुधाकर ढोरे, किरण भिलारे , वडगांव शहर महिला मोर्चा अध्यक्ष सुनीता भिलारे, माजी उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर, नगरसेवक ॲड.विजयराव जाधव, किरण म्हाळसकर, रवींद्र म्हाळसकर, राणी म्हाळसकर, सुनंदा म्हाळसकर, सपना म्हाळसकरउपस्थित होते.