वडगाव मावळ – भारतीय जनता पक्ष, पुणे जिल्हा (उत्तर) तर्फे मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभारींची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरत आहे. भाजप पुणे जिल्हा (उत्तर) अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या पत्राद्वारे या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. या निर्णयाद्वारे पक्षाने मावळ तालुक्यातील निवडणुकीच्या रणनितीची दिशा स्पष्ट केली आहे. नव्या नियुक्त्यांनुसार लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीचे प्रभारीपद माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांना देण्यात आले आहे. तर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच वडगाव मावळ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून मावळ तालुका भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पुणे जिल्हा (उत्तर) अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले आहे की, स्थानिक पातळीवरील संघटन मजबूत ठेवून, आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियोजनबद्ध आणि संघटित पद्धतीने लढवायच्या आहेत. प्रत्येक प्रभारी हे आपल्या क्षेत्रात समन्वय साधून पक्षाच्या विजयासाठी प्रयत्नशील राहतील.