वडगाव मावळ: वडगाव नगरपंचायत निवडणुकीतून नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी १९ जणांनी माघार घेतली आहे. आता नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. वडगाव नगरपंचायत निवडणूक प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन पक्षांमध्ये होणार आहे. वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण ८९ अर्ज दाखल झाले होते. अर्ज दाखल करण्याची मुदत १८ नोव्हेंबर रोजी संपली. मंगळवारी दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननी मध्ये १२ अर्ज बाद झाले. तर ७७ अर्ज वैध ठरले. त्यात काही जणांनी दोन अर्ज भरलेल्या अर्जाची संख्या १३ होती. ते १३ अर्ज वगळण्यात आले. उर्वरित ६४ उमेदवारांमधून १९ जणांनी माघार घेतली. आता नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी ४५ जण निवडणूक लढवत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले. त्यातून सुनंदा म्हाळसकर यांनी माघार घेतली. सुनंदा म्हाळसकर या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल म्हाळसकर यांच्या आई आहेत. दरम्यान, मृणाल यांनी देखील दोन अर्ज दाखल केले होते. त्यातील एक अर्ज वगळण्यात आला. सुनंदा म्हाळसकर यांनी माघार घेतल्यानंतर आता नगराध्यक्ष पदासाठी भाजप कडून मृणाल म्हाळसकर, राष्ट्रवादी (अजित पवार) कडून अबोली ढोरे, बहुजन विकास आघाडीच्या वैशाली उदागे आणि अपक्ष नाजीम अल्ताफ शेख हे चौघे निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक २, ३ आणि ११ मध्ये चार तर ५, ७, १२, १३, १६ मध्ये तीन आणि उर्वरित सर्व प्रभागांमध्ये दोन उमेदवार आहेत. काही प्रभागांत सरळ लढतीची शक्यता तर काही प्रभागांत तिरंगी, चौरंगी मुकाबला अधिक चुरशीचा होणार आहे. माघार घेतलेले उमेदवार मिरा चंद्रकांत पारधी, मनीषा वैभव पिंपळे, रूपेश गोरख चव्हाण, योगेश सतीश तुमकर, शरद चंद्रकांत ढोरे, समीर सुरेश ढोरे, अर्पण चंद्रकांत ढोरे, भाग्यश्री सतिश गाडे, रेखा विलास दंडेल, मंगेश पांडुरंग खैरे, संतोष किसन भालेराव, रूपाली अमोल पगडे, नितीन भोकसे, संदीप चंद्रकांत ढोरे, प्रशांत भिलारे, पवनकुमार दंडेल, रेश्मा भरत मोरे, लीला सतीश म्हाळसकर, पूनम प्रविण ढोरे.