वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या संख्येत दुबार नावे आढळली आहेत. एकूण मतदार १९ हजार ६१४ असून १६३८ मतदार दुबार झाले आहेत. दुबार मतदार कोणत्या प्रभागात मतदान करणार आहेत, याबाबत त्यांनी लेखी अर्ज करावेत, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे. मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नगरपंचायत प्रशासनाने ८ ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील निर्देशानुसार व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तसेच निवडणूक आयोगाकडील प्राप्त संभाव्य यादी अन्वये प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे. यामध्ये काही नावे एकापेक्षा अधिक वेळा आली असल्याचे आढळून आले आहे. एकूण मतदार १९ हजार ६१४ असून त्यात १६३८ मतदार दुबार झाले आहेत. संबंधित दुबार असलेल्या नावांची यादी वडगाव नगरपंचायत सूचनाफलकावर तसेच https:///mahaulb. in या संकेतस्थळावर २९ पासून उपलब्ध आहे. या यादीत नाव असलेल्या नागरिकांनी त्यांना कोणत्या प्रभागात मतदान करावयाचे आहे याबाबत लेखी अर्ज रहिवास पुराव्यासह ३० रोजी दु. ३ वाजेपर्यंत वडगाव नगरपंचायत कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले.