नवी दिल्ली – जगभरात करोनाचा प्रसार हा आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या माध्यमातून झाला आहे. श्रीमंतांनी विमानातून आणलेल्या या विषाणूमुळे भारतातील कामगारांना हजारो मैल पायपीट करावी लागली व काहींना त्यातच प्राणही सोडावे लागले अशा बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र या करोनाने जगाचे सगळे चित्रच बदलून टाकले आणि करोनापूर्वीचे आणि नंतरचे जग अशी विभागणी झाली आहे. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेलाही याचा मोठा फटका बसला. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता जगातले प्रमुख देश आणि मोठ्या कंपन्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी व्हॅक्सिन पासपोर्ट सुरु करण्याच्या विचारात आहेत. करोनाच्या काळात जगातल्या अनेक देशांत विमान प्रवासाला बंदी आली. दुसऱ्या देशांतील नागरिकांना आपल्या देशात प्रवेश करण्यास जवळपास सर्वच देशांनी बंदी घातली. आता परिस्थिती सामान्य होण्यास सुरुवात झाली आहे. भारतासह अनेक देशांत लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे व्हॅक्सिन पासपोर्ट हा नवाच शब्द सध्या सातत्याने कानावर येतो आहे. एका देशातून दुसऱ्या देशात जायला पासपोर्टची गरज असते. आता करोना सारख्या महामारीला थांबवण्यासाठी अमेरिकेसोबत अनेक देशांनी डिजिटल हेल्थ पासपोर्ट तयार करण्यावर भर दिला आहे. त्यामधून समजेल की आपल्या देशात येणाऱ्या प्रवाशाने करोनाची लस घेतली आहे की नाही. याच डिजिटल पासपोर्टला व्हॅक्सिन पासपोर्ट असे म्हटले जाते आहे. जगभरात डिडिटलायझेशनची प्रक्रिया जलद गतीने सुरु आहे. अशावेळी आपली माहिती वा डेटा लीक होण्याची शक्यता असते. सध्या फेसबुक, व्हॉट्स अप अशा सोशल मीडियामधून डेटा लीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे व्हॅक्सिन पासपोर्टच्या डेटा सुरक्षेवरही मोठी चर्चा केली जात आहे. अनेक देशांसमोर त्याच्या गोपनियतेचे आव्हान आहे. हा पासपोर्ट माहितीच्या स्वरुपात असेल की त्यासाठी एक ऍप तयार करण्यात येईल याची निश्चिती अजून झाली नाही. हा एक डिजिटल पासपोर्ट असेल असे जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्लूएचओनेही म्हटले आहे. त्यामुळे आतंरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्याची आरोग्याची स्थिती आणि त्याने करोनाची लस घेतली आहे की नाही याची माहिती मिळेल. अनेक कंपन्यांनी याच्या ऍपचे आणि सॉफ्टवेयर डिजाइनिंगचे काम सुरु केले आहे.