Pune : ‘उवसग्गहरं स्तोत्रा’च्या दशकपूर्ती सोहळ्यात भाविकांची मंत्रमुग्ध साथ
Pune : पुण्यातील बिबवेवाडी जैन स्थानकात उवसग्गहरं स्तोत्राच्या सामुदायिक जापाच्या दशकपूर्ती सोहळ्यात सुमारे ८ हजार भाविक सहभागी झाले.

Pune : जैन परंपरेत परमपावन मानल्या जाणाऱ्या ‘श्री उवसग्गहरं स्तोत्रा’च्या सामुदायिक जापाने यंदा दहा वर्षांचा टप्पा गाठला. रविवार, ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता बिबवेवाडी जैन स्थानकाच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य मंडपात सुमारे ८,००० भाविकांनी एकसुरात हा मंगलमंत्र म्हणत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन काढला.
या मंगल सोहळ्याला दिगंबर आचार्य पू. श्री प्रणामसागरजी म. सा. वाणीचे जादूगार पू. श्री रमणिकमुनिजी म. सा.,वीरायतनच्या शिल्पकार आचार्य पू. श्री चंदनाजी म. सा. यांच्या सुशिष्या पू. श्री विभाजी म. सा. व पू. श्री संघमित्रा जी म. सा., तसेच ज्यांचे आता आर. एम. डि स्थानक बिबवेवाडी मध्ये चातुर्मास चालू आहे त्या साध्वी पू. श्री जयश्रीजी म. सा. आदिठाणा इत्यादि साधू-साध्वीगणांचे आशीर्वचन लाभले.
आर. एम. धारीवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन, उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. स्वागत प्रसंगी शोभाताई रसिकलाल धारीवाल यांनी आपला वैयक्तिक अनुभव उलगडला. त्या म्हणाल्या, जैन धर्मातील हजारो वर्षांच्या संस्कार – परंपरेत सांगितलेल्या मंत्रांपैकी उवसग्गहरं स्तोत्र हे संकटनाशक असल्याचा प्रत्यय स्वतः घेतल्याचे त्यांनी सांगितले. रसिकलालजी धारीवाल है रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना याच जापातून मिळालेल्या सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांचे प्राण वाचल्याचा ठाम विश्वास व्यक्त करत, याच श्रद्धेपोटी गेली दहा वर्षे हा उपक्रम अखंड सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोहळ्यात उभारलेल्या खास पुस्तक स्टॉलवरून भाविकांना मोफत पुस्तके देण्यात आली, तर पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत सुमारे २०० भारतीय रोपांचेही निःशुल्क वाटप करण्यात आले. अध्यात्म आणि निसर्गसंवर्धन यांची सुरेख सांगड घालणारा हा क्षण ठरला. भक्तिभावाने भारावलेला हा सोहळा, दशकपूर्तीच्या निमित्ताने समाजातील सर्व स्तरांना एका सूत्रात गुंफणारा ठरला.






