Uttarakhand Violence : उत्तरखंडातील हल्दवानी येथील वनभुलपुरा येथील मलिक यांच्या बागेत बांधलेली बेकायदेशीर मशीद तसेच मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या प्रशासन आणि पोलिसांवर तसेच प्रसारमाध्यमांवर मुस्लिम समाजाच्या जमावाकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक पोलीस जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहेत. हिंसेच्या घटनेनंतर हल्द्वानीमध्ये इंटरनेट सेवा बंद आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात पोलीस अलर्ट मोडवर असल्याचे म्हटले जात आहे.
राज्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेहरादून, हरिद्वार आणि उधम सिंह नगर जिल्ह्यात पोलीस पूर्ण सतर्क आहेत. डेहराडून एसएसपीनेही शहरभर हालचाली वाढवल्या आहेत. प्रत्येक कानाकोपऱ्यावर पोलिसांची नजर असून सर्वसामान्यांनी अफवांवर लक्ष देऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. हल्द्वानीच्या घटनेनंतर ग्रामीण भागात अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व अधिकारी रस्त्यांवरील प्रत्येक कामावर लक्ष ठेवून आहेत. सीएम पुष्कर धामी देखील या संपूर्ण प्रकरणावर अधिकाऱ्यांकडून क्षणोक्षणी अपडेट्स घेत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि प्रशासनाव्यतिरिक्त या घटनेत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे. डीआयजी म्हणाले, ‘आमच्याकडे या संपूर्ण घटनेचे वेगवेगळे फुटेज आहेत, या घटनेचा तपास केला जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.’
उत्तराखंड हल्द्वानीच्या बनभूलपुरा भागात मलिकच्या बागेत ‘बेकायदेशीरपणे’ बांधलेला मदरसा आणि नमाजची जागा होती. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय यांनी सांगितले की, या जागेजवळ तीन एकर जागा होती, जी यापूर्वीच महापालिकेने ताब्यात घेतली होती. यानंतर अवैध मदरसा आणि नमाजचे ठिकाण सील करण्यात आले. गुरुवारी जेसीबीच्या सहाय्याने अवैध मदरसा व नमाजचे ठिकाण पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मदरसा पाडताच हिंसाचार सुरू झाला.