Chardham Yatra : चारधाम यात्रेची तयारी करताय? आधी मेडिकल टेस्ट करा, उत्तराखंड सरकारचा सल्ला

देहरादून – उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. यात्रेपूर्वी सर्वांनी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असं सरकारने म्हटलं आहे. याशिवाय, यात्रेसाठी चालण्याचा सराव, प्राणायाम आणि हृदयासाठी व्यायाम करावा, असंही सुचवलं आहे. दरवर्षी चारधाम यात्रेत अनेक भाविकांचा आजारपणामुळे मृत्यू होतो. गेल्या वर्षी 246, तर 2023 मध्ये 242 भाविकांचा मृत्यू झाला होता. उंचावर ऑक्सिजन कमी पडणं आणि हृदयविकार हे मृत्यूचं मुख्य कारण आहे.
यात्रा 30 एप्रिलपासून गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरं उघडल्यावर सुरू होईल. केदारनाथ 2 मे आणि बद्रीनाथ 4 मे पासून भाविकांसाठी खुलं होईल. सरकारने 12 भाषांमध्ये हा सल्ला जारी केला असून, भाविकांनी पुरेशा औषधांसह यावं आणि ‘स्वास्थ्य व पर्यटन पंजीकरण ॲप’वर नोंदणी करावी, असं सांगितलं आहे.
भाविकांसाठी सूचना:
यात्रेत भरपूर पाणी, संतुलित आहार आणि हलके गरम पेय घ्यावे. मार्गावर असलेल्या तपासणी केंद्रांचा गरज पडल्यास वापर करावा. पावसामुळेही काही वेळा अडचणी येतात, हे लक्षात ठेवा. उत्तराखंडचे आरोग्य सचिव डॉ. राजेश कुमार म्हणाले, “भाविकांना त्रास होऊ नये म्हणून ही सूचना आहे. सर्व राज्यांनी याचा प्रसार करावा, असं आवाहन आहे.”





