Uttar Pradesh : उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांचे देशाच्या राजधानीकडे कूच; दिल्ली-नोएडा सीमेवर ट्रॅफिक जॅम

Uttar Pradesh – पंजाबमधील शेतकऱ्यांआधीच उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांनी सोमवारी देशाच्या राजधानीकडे कूच केले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक बॅरिकेडस् उभारले. त्यामुळे दिल्ली-नोएडा सीमेवर प्रचंड ट्रॅफिक जॅम होऊन प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
भारतीय किसान परिषदेच्या (भाकिप) आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. ते शेतकरी उत्तरप्रदेशच्या २० जिल्ह्यांतील असल्याचे समजते. जमीन वाटप आणि भूसंपादनाचा अधिक मोबदला आदी मागण्यांवरून त्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. काही शेतकऱ्यांनी नोएडा पोलिसांनी प्रारंभीच्या टप्प्यात उभारलेले बॅरिकेडस् ओलांडले.
मात्र, त्यांना दिल्लीच्या एण्ट्री पॉईंटपासून १ किलोमीटर अंतरावर रोखण्यात पोलिसांना यश आले. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांची गर्दी आणि पोलिसांनी उभारलेले बॅरिकेडस् आदींमुळे संबंधित परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत शिरकाव करण्यापासून रोखण्यासाठी मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तूर्त तरी सीमेवरील स्थिती सामान्य आहे.
याआधी रविवारी पंजाबमधील शेतकऱ्यांनी ६ डिसेंबरला दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय जाहीर केला. ते शेतकरी पंजाब आणि हरियाणादरम्यानच्या सीमेवर फेब्रुवारीपासून तळ ठोकून आहेत.





