समान साखर दरामुळे उत्तरप्रदेशला फायदा

सत्यशील शेरकर : “श्री विघ्नहर’ची 37 वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात

निवृत्तीनगर – केंद्र सरकारने साखरेचे किमान विक्री मूल्य 3100 रुपये केले. याचा फायदा होणे अपेक्षित होते; परंतु देशामध्ये एकच दर ठेवल्याने उत्तर प्रदेशसारख्या राज्याला त्याचा फायदा झाला. संपूर्ण देशभर उत्तर प्रदेशची साखर जाऊ लागली आणि महाराष्ट्रातील साखरेचे साठे आजही पडून आहेत. याचा परिणाम साखरेवरील व्याजाचा बोजा वाढल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. 18) खेळीमेळीत झाली. अध्यक्षस्थानावरून शेरकर बोलत होते. यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व 12 विषयांना एकमुखी मंजुरी दिली. प्रारंभी विघ्नहरचे संस्थापक स्व. निवृत्तीशेठ शेरकर व स्व. सोपानशेठ शेरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कामकाजास प्रारंभ करण्यात आला.

शेरकर म्हणाले की, केंद्राने बफर स्टॉक अनुदान व साखरेवरील निर्यात अनुदान जाहीर केले; परंतु अनुदानाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. निर्यात साखरेचे अनुदान लवकर देणे अपेक्षित आहे. मागील दोन वर्षे साखर उत्पादन जास्त झाले. बाजारभाव कमी होऊन शेतकऱ्यांना पैसे देणे अवघड झाले. यावर केंद्राने कारखान्यांना सॉफ्टलोनद्वारे पैसे उपलब्ध करून दिले. तथापि, कर्जाचा बोजा कारखान्यांवर आला. ही कर्जाची परतफेड एक वर्षे मुदतीची असल्याने याचा परिणाम कारखान्यांच्या खेळते भांडवलावर होत आहे. मात्र, श्री विघ्नहर कारखान्याच्या 2018-19 मध्ये गळीतास आलेल्या उसाची एफआरपी प्रतिटन 2685 रुपये इतकी होती.

हंगामात संपूर्णपणे एफआरपी अदा केली आहे. आगामी 2019-20 गाळप हंगामात 8 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असून, ऊस तोडणी यंत्रणा सज्ज आहे. 97 व्या घटना दुरुस्तीनुसार क्रियाशिल सभासद राहणेसाठी 5 वर्षांमधून एकदा गाळपास ऊस घालणे आणि 5 वर्षामधून एकदा वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणे सभासदास अनिवार्य आहे, याबाबत त्यांना वेळोवेळी नोटिशीद्वारे, अहवालाद्वारे कळविले आहे.

सभासद क्रियाशिल नसल्यास त्यांना मिळणाऱ्या अनेक सवलती, सोयीसुविधा व हक्कापासून ते वंचित राहणार आहेत. सर्व सभासदांनी याबाबत जागरुक रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

“विघ्नहर’ला प्रमुख दोन पुरस्कार
“विघ्नहर’ला 2018-19 साठीचा नॅशनल फेडेरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्‍टरीज, नवी दिल्ली संस्थेकडून तांत्रिक कार्यक्षमतेचा उच्च साखर उतारा विभागातील संपूर्ण देशातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सलग तिसऱ्यांदा मिळाला असून नुकताच भारतीय शुगर या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखर उद्योगासाठी काम करणाऱ्या अशा प्रथितयश संस्थेकडून कारखान्यास राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट ऊस विकासाचे पारितोषिक मिळाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.