“राज्याला आग लागल्यावर पळून गेलेला बिबट्या…” ; उत्तम जानकरांची अजित पवारांवर टीका

Uttam Jankar on Ajit Pawar । राज्यात काही महिन्यातच विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत. त्याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होत आहे. दरम्यान, अशातच सध्या अजित पवार स्वगृही परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर बोलताना सडकून टीका केली. “राज्याला आग लागल्यावर पळून गेलेला बिबट्या आता परत येऊन आग विझविणाऱ्या चिमण्यांची शिकार करण्याच्या तयारीत, त्याला घेऊ नका”, असं म्हणत उत्तम जानकरांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधलाय.
इकडे येऊन याच चिमण्यांची शिकार करणार Uttam Jankar on Ajit Pawar ।
लोकसभेच्या निकालानंतर अनेक नेत्यांची शरद पवार गटात इनकमिंग सुरू आहे. तर काही नेते घरवापसी करत आहेत. यावरून उत्तम जानकर यांनी अजित पवारांना डिवचलं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या अजगराचा विळखा देशाला आणि राज्याला पडला होता. कोणीही उघड बाहेर पडायला तयार नव्हतं. जंगलाला आग लागल्यावर आपला बिबट्याही 40 जणांना घेऊन पळून गेला होता. मात्र यावेळी पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी चिमणी बनून आपल्या चोचित थेंब थेंब पाणी टाकून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि मतदारांनी मतांचा पाऊस पडल्यानं ही आग विझली. आता हाच बिबट्या पुन्हा शिकारीला बाहेर पडायच्या तयारीत आहे. इकडे येऊन याच चिमण्यांची शिकार करणार असल्यानं त्याला येऊ देऊ नका, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय सेलच्या कार्यक्रमात जानकर यांनी अजित पवार यांच्या प्रवेशाला विरोध करताना जोरदार टोलेबाजी केली.
आजही उत्तम जानकर हे अधिकृतपणे अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीत असले तरी संपूर्ण लोकसभा निवडणुकीत त्यांनी अजितदादा यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेत बारामतीमध्ये देखील जोरदार प्रचार केला होता. दरम्यान, अजित पवारांच्या घरवापसीवर बोलताना उत्तम जानकर यांनी,”आपण चळवळीतील कार्यकर्ता असून आयुष्यात आजपर्यंत 39 निवडणूक लढवून त्यातील 36 निवडणूक हरलो होतो. मात्र, आपण कधीही निराश झालो नाही किंवा कोणाला घाबरलोही नाही,” असा सल्ला त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
अजितदादा यांच्या घरवापसीला कडाडून विरोध Uttam Jankar on Ajit Pawar ।
यानंतर माध्यमांशी बोलताना जानकर यांनी अजितदादा यांच्या घरवापसीला कडाडून विरोध केला. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत आघाडीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा करताना भाजप जात जात पुढच्या सत्ताधाऱ्यांना राज्यच चालवता येऊ नये, अशी अवस्था बनवत असल्याचा आरोपही केला आहे. यातूनच लाडकी बहीण सारख्या खर्चिक योजना आणल्या जात असून ही लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना असल्याचा टोलाही यावेळी उत्तम जानकरांनी लगावला आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नाचे औषध फक्त शरद पवार यांच्याकडे असून सत्ताबदल झाल्यावर ते निघेल, असाही दावा जानकर यांनी केला आहे.





