केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये 5 नवीन जिल्हे निर्माण करणार; अमित शाह यांची घोषणा

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने नुकतेच हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूकीची घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीर हा संवेदनशील केंद्रशासित प्रदेश असल्याने त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पुढील महिन्यात 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रशासित लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, निवडणूकीपूर्वी ही घोषणा करत भाजपने नवीन खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.
याबाबत ट्वीट करत अमित शहा यांनी म्हटले की, विकसित आणि समृद्ध लडाख तयार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने पाच नवीन जिल्हे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे पाच नवीन जिल्हे असतील, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच लडाखच्या प्रत्येक भागात प्रशासन मजबूत करून नागरिकांना त्याचे फायदे पोहोचवले जातील. मोदी सरकार लडाखमधील लोकांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लडाखमध्ये आता 7 जिल्हे
1979 मध्ये लडाखचे कारगिल आणि लेह जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले. 1989 मध्ये बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये दंगली झाल्या होत्या. त्यानंतर 1990च्या दशकातच लडाखला काश्मिरी राजवटीपासून मुक्त करण्यासाठी लडाख स्वायत्त हिल विकास परिषद स्थापन करण्यात आली. यानंतर 5 ऑगस्ट 2019 रोजी लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे करत केंद्र सरकारने नवीन केंद्रशासित प्रदेश तयार केले होते. त्यावेळी लडाखमध्ये लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे होते. मात्र आता केंद्र सरकारच्या निर्णयानंतर लडाखमध्ये 7 जिल्हे तयार झाले आहेत. विशेष म्हणजे लडाख हा भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचा प्रदेश आहे. दरम्यान, केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे लडाख हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली येते.





