अमेरिकी बनावटीच्या रायफल्सचा दहशतवाद्यांकडून वापर

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही वर्षांपासून दहशतवादी अमेरिकी बनावटीच्या एम४ कार्बाईन रायफल्स वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लष्करी तज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी नुकताच भीषण हल्ला घडवला. त्या हल्ल्यात एम४ चा वापर झाल्याचे आढळले.
अमेरिकी लष्कराने २०२१ या वर्षी अफगाणिस्तानमधून आपले सैनिक मागे घेतले. त्या सैनिकांची मागे राहिलेली शस्त्रास्त्रे पाकिस्तानी म्होरक्यांच्या माध्यमातून दहशतवाद्यांपर्यंत पोहचल्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. वजनाने अतिशय हलक्या असल्याने एम४ रायफल्स घेऊन सहजपणे वावर करता येऊ शकतो. त्या रायफल्समधून दर मिनिटाला ७०० ते ९७० फैरी झाडल्या जाऊ शकतात.
त्या ५०० ते ६०० मीटर अंतरापर्यंत अतिशय प्रभावीपणे मारा करू शकतात. एम४ मध्ये स्टीलच्या गोळ्यांचा वापर होतो. त्यामुळे त्या रायफल्स अधिक घातक मानल्या जातात. अफगाणिस्तान सोडताना शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा बहुतांश साठा उद्धवस्त केल्याचा दावा अमेरिकेकडून केला जातो. तसे असले तरी बरीच शस्त्रास्त्रे मागे तशीच पडून राहिली. ती दहशतवाद्यांच्या हाती गेली असल्याचे तज्ञांना वाटते. सर्वप्रथम नोव्हेंबर २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरात दहशतवाद्यांकडून एम४ रायफल जप्त करण्यात आली.





