USA vs Russia : रशिया भारताला फसवू शकतो, वेळ आली तर पुतीन चीनचीच बाजू घेतील – अमेरिका

वॉशिंग्टन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ८ आणि ९ जुलै रोजी रशिया दौरा झाला. मॉस्कोमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख आपले परम मित्र असा केला आणि रशियाच्या सर्वोच्च नागरी किताबाने मोदी यांचा गौरवही करण्यात आला. तथापि, भारत आणि रशिया यांची अनेक दशकांपासून ही मैत्री अमेरिकेला तेवढीशी रूचलेली नाही.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांच्या म्हणण्यानुसार भारताने प्रदीर्घ काळ रशियावर विश्वास ठेवणे भारतासाठी चांगले नाही. जर आशियातील महाशक्ती भारत आणि चीन यांच्यात कधी युध्द झाले तर रशिया चीनच्या बाजूने उभा राहीलेला दिसेल. एक विश्वासू भागिदार म्हणून प्रदीर्घ काळासाठी रशियावर विश्वास ठेवणे कोणासाठीही हिताचे नाही असे आम्ही भारतासह प्रत्येक देशाला सांगितले आहे.
गेल्या काही काळात रशिया चीनच्या अधिक जवळ जाताना दिसतो आहे. अगदी नेमक्या शब्दांत सांगायचे झाल्यास रशिया हा चीनचा ज्यूनियर पार्टनर होत चालला असल्याचे दिसते आहे. त्यामुळे रशिया कधीही भारतापेक्षा चीनचीच बाजू घेण्याची शक्यता जास्त आहे. भारताच्या विरोधात चीनच्या संभाव्य आक्रमकतेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निश्चितच चिंता असणार.
मात्र त्याचवेळी भारत आणि रशिया यांचे ऐतिहासिक संबंध असल्याचेही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या सुलिवन यांनी मान्य केले व ही गोष्ट काही एका रात्रीत बदलणार नाही अशी कबुलीही त्यांनी दिली. ते म्हणाले की ही एक प्रदीर्घ खेळी आहे भारतासारख्या जगभरातील अनेक लोकशाहीवादी देशांशी अमेरिका आपले संबंध दृढ करते आहे. आम्ही जसे जसे पुढे जाऊ तसे आमचे संबंध अधिक दृढ होत जातील.





