बगदाद दुतावासावरील हल्ल्यानंतर अमेरिका जादा लष्कर पाठवणार

बगदाद : अमेरिकेच्या बगदाद येथील दुतातवासावर काल काही निदर्शकांनी हल्ला केल्यानंतर आता इराकला जादा लष्कर पाठवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेने इराक आणि सीरियातील इराण समर्थक गनिमांच्या ठिकाणांवर हल्ला करून किमान 24 जणांना ठार मारले आहे.
त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी या गनिमांच्या शेकडो समर्थकांनी बगदाद मधील हाय सिक्युरिटी झोन मध्ये असलेल्या अमेरिकन दुतावासात घुसून तेथे हल्ला केला व अमेरिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे अमेरिका धास्तावली असून त्यांनी आता इराकला जादा लष्करी मनुष्यबळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी म्हटले आहे की हा हल्ला दहशतवाद्यांनीच घडवून आणला आहे. हा हल्ला ज्यांनी घडवला त्यात अबु महदी अल मुहादिंस याचा समावेश होता असेही त्यांनी म्हटले आहे. मुहांदिस हा हशेद अल शाबी या दहशतवादी संघटनेचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता मानला जातो.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्यांच्या लष्कराच्या रॅपिड रिस्पॉन्स युनिट मधील साडे सातशे जवानांचे पथक तिकडे पाठवण्याचे ठरवले असून हे पथक पुढील अनेक दिवस तिकडेच राहणार आहे असे पॉम्पेओ यांनी सांगितले. अमेरिकेच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना असेला सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकेच्या जादा सुरक्षा पथकाची टीम या आधीच बगदादच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बगदाद दुतावासावरील हल्ल्याबद्दल इराणला जबाबदार धरले असून त्यांनी एक जरी अमेरिकन नागरीक तेथे मारला गेला तर इराणला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.





