अमेरिका तैवानला विकणार 1 अब्ज डॉलरची शस्त्रे; चीनला टक्कर देण्यासाठी खरेदी

वॉशिंग्टन – तैवानला तब्बल 1.1 अब्ज डॉलर किंमतीची शस्त्रे विकण्याचे नियोजन बायडेन प्रशासनाकडून केले जाते आहे. त्यामध्ये 60 रणगाडा भेदी आणि हवेतून हवेत मारा करणाऱ्या 100 क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. पेलोसी यांच्या दौऱ्यापासून चीन आणि अमेरिकेदरम्यान निर्माण झालेला तणाव गेल्या काही दिवसात आणखीनच वाढू लागला आहे.
पेलोसींच्या दौऱ्यादरम्यानच चीनने तैवानच्या खाडीमध्ये जोरदार युद्धसराव केला होता. तैवानला ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर केला जाण्याची धमकीही चीनने उघडपणे दिली आहे. त्या पार्श्वभुमीवर तैवानला शस्त्रविक्री करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.
तैवानचे नियंत्रण असलेल्या बेटांच्या जवळ चीनची ड्रोन उडताना बघितली गेल्याची तक्रार तैवानने केली होती. या ड्रोनच्या आधारे तैवानने चीनला चक्क चोर म्हणून लेबल लावून टाकले होते. मात्र हा अनावश्यक वाद निर्माण केला जात असल्याचे सांगून चीनने स्पष्ट शब्दात ही तक्रार फेटाळून लावली आहे.
तैवानला आपला पाठिंबा कायम असून यापुढील काळात हा पाठिंबा आणखीन भक्कम असेल, असे बायडेन प्रशासनाने म्हटले आहे. तैवानला अमेरिकेकडून आणखीन शस्त्रांची मदतही केली जाऊ शकते. या शस्त्रांचा तपशील येत्या काही आठवड्यात किंवा काही महिन्यात जाहीर केला जाईल. असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. मात्र आता अमेरिकेकडून चीनच्या विरोधात वापरण्यासाठी जी शस्त्रे तैवानला दिली जाणार आहेत, त्यामुळे चीनचा तिळपापड होणार आहे, हे निश्चित आहे. (US to sell $1 billion worth of arms to Taiwan; Buying to rival China)





