चीनवरील अतिरिक्त शुल्कामुळे अमेरिकन शेअर बाजारात घसरण; डाऊ, एस&पी आणि नॅसडॅक निर्देशांक कोसळले

न्यूयॉर्क – या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर गेले होते. मात्र दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूवर 100% अतिरिक्त शुल्क लावण्याचे जाहीर केले. त्यामुळे अमेरिकन शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढून निर्देशांक कोसळले.
ट्रम्प यांनी सांगितले की, आपण चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी उत्सुक होतो. यासंदर्भात तीन आठवड्यात दोन्ही नेत्यांची दक्षिण कोरियात बैठक होणार होती. मात्र चीनची अमेरिकेविरोधात नकारात्मक भूमिका वाढली आहे. अशा परिस्थितीत या बैठकीला अर्थ नाही. जागतिक उद्योगासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची निर्यात करत नसल्याबद्दल ट्रम्प संतापले आहेत.
या घडामोडीनंतर अमेरिकन शेअर बाजारात विक्री वाढली. त्यामुळे डाऊ जोन्स हा निर्देशांक 1.90 टक्क्यांनी, तर एस अँड पी 500 हा निर्देशांक 2.71 टक्क्यांनी कोसळला. सर्वात जास्त नुकसान तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची नोंदणी झालेल्या नॅसडॅकवर झाला.
हा निर्देशांक तब्बल 3.56 टक्क्यांनी कोसळला. एप्रिलनंतर शेअर बाजार निर्देशांक प्रथमच एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. एनव्हीडीया, अॅमेझॉूइत्यादी तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात दोन टक्क्यापेक्षा जास्त घट झाली आहे.
कत्रीम बुद्धिमत्ता क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांची आगेकूच पाहिली असता या वर्षात आतापर्यंत अमेरिकन निर्देशांक जवळजवळ 11 टक्क्यांनी वाढले होते. मात्र आता गुंतवणूकदार सावध झाले असून कंपन्यांच्या शेअरचे भाव आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.
जेपी मॉर्गन चेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमीन डिमॉन यांनी सांगितले की, अमेरिकन कंपन्यांच्या शेअरचे भाव आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यामुळे पुढील सहा महिन्यांमध्ये अमेरिकन शेअर बाजारामध्ये मोठे करेक्शन होण्याची शक्यता वाढली आहे.





