US | ‘पाकिस्तानात जाण्यापूर्वी दोन वेळा विचार करा…’, जाणून घ्या अमेरिकेने आपल्या नागरिकांना का दिला इशारा

वॉशिंग्टन – पाकिस्तानात सध्या धार्मिक आणि वांशिक स्वरूपाचा हिंसाचार सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानात जाण्यापूर्वी दोन वेळा विचार करावा. अत्यंत आवश्यक नसेल तर पाकिस्तानात जाणे टाळावे अशी सावधगिरीची सूचना अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिली आहे.
पाकिस्तानच्या बहुतांश भागात हिंसाचार आणि अस्थिर वातावरण आहे. त्यामुळे शक्यतो तेथे जाण्याचे टाळावे. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वां भागात दहशतवाद आणि अपहरणाच्या गंभीर घटना घडत आहेत. त्यामुळे या भागापासून तर लांबच राहावे असे अमेरिकेकडून त्यांच्या लोकांसाठी जारी करण्यात आलेल्या ऍडव्हायजरीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
अत्यंत गंभीर स्वरूपाचा आणि प्रदीर्घ काळ असणारा धोका असेल तर अमेरिका तिसऱ्या श्रेणीत ती धोक्याची सूचना जारी करते. आता जारी करण्यात आलेली सूचना याच श्रेणीतला असल्यामुळे अमेरिकेच्या नागरिकांसाठी हा महत्वाचा इशारा असल्याचे मानले जाते. दहशतवादापासून सावध राहावे आणि नियंत्रण रेषेजवळील तणावपूर्ण भागातही जाणे टाळावे असे सांगण्यात आले आहे.
विविध दहशतवादी संघटनांकडून पाकिस्तानात सातत्याने कारवाया सुरू आहेत. तेथील कट्टरपंथीयांकडूनही हिंसाचार सुरू आहे. यातून नागरिकांसोबतच तेथील पोलीस आणि स्थानिक सैनिकांवरही हल्ले केले जात आहेत. दहशतवाद आणि वैचारिक कट्टरपंथाशी निगडीत हिंसाचाराचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. त्याचा फटका शेजारी देशांप्रमाणेच पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिक आणि सुरक्षा रक्षकांनाही बसत असतो.





