अमेरिकेच्या धोरणात मोठा बदल, युक्रेनविरोधात ट्रम्प यांची रशियाला साथ? UN मध्ये नक्की काय घडलं? वाचा

Ukraine Russia war | रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. 24 फेब्रुवारी 2022 ला राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आदेशावर रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर हल्ला केला होता. 3 वर्षानंतर हे युद्ध थांबवण्यासाठी विविध देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. यातच, संयुक्त राष्ट्रात मांडण्यात आलेल्या प्रस्तावावेळी वेगळे चित्र पाहायला मिळाले. यूक्रेन युद्धाबाबत संयुक्त राष्ट्रात सादर केलेल्या प्रस्तावावर अमेरिका आणि रशिया एकत्र आल्याचे दिसले.
संयुक्त राष्ट्रात या युद्धासंदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला रोखण्याची अमेरिकेची ही पहिलीच वेळ आहे. या प्रस्तावात यूक्रेनविरुद्धच्या युद्धात सैन्य माघारी, शत्रुता समाप्त करणे आणि शांततापूर्ण तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
युरोपियन देश आणि जी7 (अमेरिकेला वगळून) यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले, त्यामुळे या प्रस्ताव मंजूर झाला. मात्र, भारत आणि चीनने या मतदानात भाग घेतला नाही. प्रस्ताव संमत होणे ही युक्रेनसाठी जमेची बाजू असले तरीही त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणारा पाठिंबा कमी होत चालल्याचे दिसून येत आहे.
या प्रस्तावाला 93 देशांचा पाठिंबा मिळाला, तर 18 देशांनी त्याचा विरोध केला आणि 65 देशांनी मतदानात भाग घेतला नाही. म्हणजेच 83 देश तीन वर्षांपासून युद्ध सहन करत असलेल्या यूक्रेनच्या बाजूने उभे नाहीत. प्रस्ताव मंजूर झाल्याने संयुक्त राष्ट्र महासभेने त्याला आपली मान्यता दिली. यामध्ये युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर यूक्रेनमधून सर्व रशियन सैनिकांची तात्काळ माघार घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
यूक्रेनवरून संयुक्त राष्ट्रात अमेरिका आणि यूरोपियन देशांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. अमेरिकेने रशियन आक्रमणाचा निषेध करण्याच्या आणि यूक्रेनमधून रशियन सैन्याच्या तात्काळ माघारी घेण्याच्या मागणीच्या प्रयत्नाला विरोध केला. ट्रम्प प्रशासनाने या प्रस्तावातील भाषेची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याविरोधात मतदान केले.
त्यानंतर अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात युद्ध समाप्तीची मागणी करणारा वेगळा प्रस्ताव सादर केला. हे दोन्ही प्रस्ताव मंजूर झाले. मात्र बहुतेक युरोपियन सहकारी देशांच्या विरोधात जाऊन रशियाच्या बाजूने उभे राहिल्यामुळे अमेरिकेच्या भूमिकेत मोठा बदल झाल्याचे दिसून आले.





