अमेरिकेच्या निर्बंधांमुळे ‘रिलायन्स’च्या रशियातील तेल खरेदीवर परिणाम; कंपनी करणार नियमांचे पालन

नवी दिल्ली – अमेरिकेने रशियातील सर्वात मोठ्या दोन तेल कंपन्यावर निर्बंध घातले आहेत. भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज रशियातील या कंपन्याकडून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात खनिज तेल आयात करत होती. मात्र आता अमेरिकेने या दोन कंपन्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजची या दोन कंपन्याकडून होणारी खरेदी कमी होणार आहे.
अमेरिकेने घातलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी करण्यास आपण सहकार्य करू आणि निर्बंधाच्या चौकटीत काम करू असे स्पष्टीकरण रिलायन्स इंडस्ट्रीजने जरी केले आहे. या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, अमेरिकेने जे निर्बंध जारी केले आहेत त्या निर्बंधाच्या कागदपत्राचा आम्ही अभ्यास करीत आहोत.
रिलायन्स इंडस्ट्रीज रशियातील दोन कंपन्या पैकी एका कंपनीकडून मोठ्या प्रमाणात खनिज तेल खरेदी करते. त्यासाठी 25 वर्षाचा करार झालेला आहे. मात्र लघु पल्यात तरी अमेरिकेने घातलेल्या निर्बंधानुसार तेल खरेदी कमी केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
अमेरिकेबरोबरच युरोपियन समुदाय आणि ब्रिटननेही रशियन तेल कंपन्यावर निर्बंध जारी केलेले आहेत. याचा अभ्यास करण्यात येत आहे असे प्रवक्त्याने सांगितले. या देशांनी रशियन तेल खरेदी न करण्याबरोबरच या कंपन्याकडून घेतलेले तेल शुद्धीकरण केल्यास निर्यात करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज रशियाकडून पूर्णपणे तेल खरेदी बंद करणार आहे की नाही हे मात्र प्रवक्त्याने स्पष्ट केले नाही.
रिलायन्स इंडस्ट्रीजकडे जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण यंत्रणा आहे. आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजने रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी केले आणि शुद्धीकरण करून ही उत्पादने निर्यात केली आहेत. अशा परिस्थितीत आगामी काळात या घटनाक्रमाचा कंपनीच्या व्यवहारावर लघु ते मध्यम पल्ल्यात नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.





