अमेरिकेच्या ‘जशास तसे’ धोरणाचा भारताला फटका: निर्यातीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली – अमेरिका जशास तसे आयात शुल्क लावणार आहे. अशा परिस्थितीत कृषी उत्पादने, यंत्रसामग्री, औषधी, दागिने, मौल्यवान खडे, इलेक्ट्रिक उपकरणे, रसायन, पोलाद इत्यादीच्या अमेरिकेला होणार्या निर्यातीवर लघु पल्ल्यात अंशतः परिणाम शक्य आहे. दरम्यान भारत आणि अमेरिकेचे वाणिज्य मंत्रालय परस्परांना पूरक व्यापार धोरण तयार करीत आहेत. असे असतानाच इतर काही पर्याय सरकार आणि उद्योग क्षेत्राने तयार ठेवले असल्याचे समजते. याच कारणामुळे निर्यात शुल्काच्या घोषणेच्या एक दिवस अगोदर शेअर बाजारात निवडक खरेदीचे वातावरण होते.
अमेरिका भारतीय वस्तूवर जितक्या प्रमाणात आयात शुल्क लावते त्यापेक्षा जास्त प्रमाणात भारत अमेरिकन वस्तूवर आयात शुल्क लावतो. आता जशास तसे पद्धतीने म्हणजे रेसिप्रोकल पद्धतीने अमेरिका भारत जेवढ्या प्रमाणात आयात शुल्क लावतो तेवढ्याच प्रमाणात आयात शुल्क लावणार आहे. त्यामुळे भारत ज्या वस्तूवर जास्त आयात शुल्क लावतो, त्या वस्तूच्या अमेरिकेला होणार्या निर्यातीवर परिणाम होणार आहे.
सर्वात जास्त परिणाम मासे, मांस आणि प्रक्रिया केलेल्या समुद्री खाद्यावर होणार आहे. 2024 मध्ये भारताने या वस्तूची अमेरिकेला 2.58 अब्ज डॉलरची निर्यात केली. मात्र या वस्तूमध्ये निर्यात शुल्कात फरक सर्वात जास्त म्हणजे 27.83% इतका फरक आहे. भारतातील एकूण सिंपल्यापैकी 40% सिंपले अमेरिकेला निर्यात होतात. या निर्यातीवर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. मात्र या क्षेत्रातील भारताचे स्पर्धक असलेल्या इंडोनेशिया आणि ईक्वॅडोर या देशावरही अमेरिका आयात शुल्क लावणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती परिणाम होतो हे अमेरिकेच्या घोषणेनंतर कळेल.
प्रक्रियायुक्त पदार्थ, साखर आणि कोका या क्षेत्रातील आयात शुल्कातील तफावत 24.99% आहे. भारताने गेल्या वर्षी या क्षेत्रातून 1.03 अब्ज डॉलरची निर्यात केली होती. यावरही परिणाम शक्य आहे. धान्य, भाजीपाला, फळे आणि मसाले या क्षेत्रातून 1.91 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. या क्षेत्रातील आयात शुल्कातील तफावत कमी म्हणजे 5.72 टक्के आहे.
तंबाखू आणि सिगरेटच्या निर्यातीवर मात्र जास्त परिणाम होणार नाही. 2024 मध्ये भारताने या क्षेत्रातून 94.62 दशलक्ष डॉलरची निर्यात केली होती. मात्र या वस्तूवर अमेरिका अगोदरच 201% आयात शुल्क लावते. अशा परिस्थितीत भारताच्या आयात शुल्कापेक्षा अमेरिकेचे आयात शुल्क जास्त आहे. ही चूक डोनाल्ड ट्रम्प प्रशासन दुरुस्त करणार आहे का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.





