Joe Biden : अमेरिकेकडून युक्रेनला 2.5 अब्ज डॉलरची लष्करी मदत

वॉशिंग्टन : अमेरिकेकडून युक्रेनला २.५ अब्ज डॉलरची अतिरिक्त लष्करी मदत दिली जाईल, असे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज जाहीर केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यापुर्वी जेवढी जास्त शक्य होईल तेवढी मदत युक्रेनला उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही बायडेन यांनी म्हटले आहे. या पॅकेजमध्ये १.२५ अब्ज डॉलरच्या लष्करी मदतीचा अध्यक्ष्यांच्या अधिकारातील मदतीचाही समावेश आहे.
त्यात स्वतंत्र युक्रेन सिक्युरिटी असिस्टन्स इनिशिएटिव्हद्वारे करारांतर्गत असलेल्या शस्त्रास्त्र पॅकेजमध्ये १.२२ अब्ज डॉलरच्या मदतीचाही समावेश आहे. या विशेष पॅकेजमधील सर्व निधीचा आतापर्यंत विनियोग झाला असून आता उर्वरित अतिरिक्त निधी अध्यक्षपद सोडण्यापुर्वी युक्रेनला उपलब्ध करून देणे बाकी राहिल्याचेही बायडेन यांनी म्हटले आहे.
रशियाने अलीकडील दिवसांत युक्रेनच्या उर्जा प्रकल्पांवर हल्ले सुरू केल्यामुळे नवीन मदत दिली गेली आहे, या हल्ल्यातील क्षेपणास्त्रे आणि ड्रोन मोठ्या संख्येने रोखले आहेत, असे युक्रेनने म्हटले आहे. रशिया आणि युक्रेनच्या सैन्यामध्ये अजूनही कुर्स्कच्या रशियन सीमावर्ती प्रदेशाभोवती धुमश्चक्री सुरू आहे. तिथे युक्रेनने घेतलेल्या रशियाच्या प्रदेशावर पुन्हा दावा करण्यासाठी उत्तर कोरियाचे हजारोंचे सैन्य पाठवले आहे.





