US-Israel Iran War: 23 दिवसांच्या युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा अचानक यू-टर्न; अमेरिका-इराण युद्धात मोठं वळण
US-Israel Iran War:ट्रम्प यांनी स्पष्ट केले की इराणवरील हल्ले ५ दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा हा निर्णय सुरू असलेल्या चर्चांच्या यशावर अवलंबून आहे. म्हणजेच जर चर्चा अयशस्वी झाली तर हल्ले पुन्हा होऊ शकतात, हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

US-Israel Iran War: अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला (पेंटागन) इराणच्या वीजप्रकल्पांवर आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवरील सर्व लष्करी हल्ले पुढील ५ दिवसांसाठी तात्पुरते थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
दोन दिवसांच्या सकारात्मक चर्चेनंतर निर्णय –
ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया मंचावर सांगितले की गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यपूर्वेतील शत्रुत्व संपुष्टात आणण्यासाठी सखोल, तपशीलवार आणि रचनात्मक चर्चा झाली. या चर्चांचे वातावरण अत्यंत सकारात्मक राहिले असून ही बोलणी पुढील आठवडाभर सुरू राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हल्ला थांबवण्याची अट –
ट्रम्प यांनी स्पष्ट केले की इराणवरील हल्ले ५ दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा हा निर्णय सुरू असलेल्या चर्चांच्या यशावर अवलंबून आहे. म्हणजेच जर चर्चा अयशस्वी झाली तर हल्ले पुन्हा होऊ शकतात, हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
US President Donald Trump posts on Truth Social, “…I have instructed the Department of War to postpone any and all military strikes against Iranian power plants and energy infrastructure for a five day period, subject to the success of the ongoing meetings and discussions” pic.twitter.com/N3Bavc4ylv
— ANI (@ANI) March 23, 2026
दोन्ही देशांनी एकमेकांना दिली होती धमकी –
अमेरिकेची (ट्रम्पची) इराणला धमकी –
शनिवारी रात्री उशिरा ट्रम्प यांनी Truth Social वर लिहिले, “इराणने ४८ तासांच्या आत होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे आणि कोणत्याही धोक्याशिवाय उघडली नाही, तर अमेरिका इराणचे वीजप्रकल्प उद्ध्वस्त करेल. सर्वात मोठ्यापासून सुरुवात करेल!” ट्रम्प यांनी हा इशारा देण्यापूर्वी एकच दिवस आधी युद्ध “आटोपते घेण्याचा” विचार असल्याचे सांगितले होते. मात्र होर्मुजवरील दबाव वाढत असताना त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला.
इराणची प्रत्युत्तरादाखल धमकी –
इराणच्या संसद अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी X वर लिहिले, “आमच्या देशातील वीजप्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर हल्ला झाल्यास संपूर्ण प्रदेशातील महत्त्वाच्या ऊर्जा आणि तेल पायाभूत सुविधा कायमस्वरूपी नष्ट केल्या जातील.” इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने स्पष्टपणे सांगितले की ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा सुविधांवर हल्ला केल्यास होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली जाईल.
होर्मुज बंद कधी आणि कसे झाले?
४ मार्च २०२६ पासून इराण लष्कराने होर्मुज सामुद्रधुनी बंद असल्याची अधिकृत घोषणा केली आणि तेथून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले केले. २ मार्च रोजीच IRGC च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सामुद्रधुनी बंद असल्याची पुष्टी केली होती. जहाजांच्या वाहतुकीत तब्बल ७०% घट झाली आणि १५० हून अधिक जहाजे धोका टाळण्यासाठी सामुद्रधुनीबाहेर नांगर टाकून थांबली.
जागतिक परिणाम –
ब्रेंट क्रूडचा भाव ८ मार्च रोजी चार वर्षांत प्रथमच १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर गेला आणि शिखरावर १२६ डॉलरपर्यंत पोहोचला. होर्मुजच्या बंदीला १९७० च्या दशकानंतरची सर्वात मोठी ऊर्जा पुरवठा विस्कळीत होण्याची घटना म्हटले जात आहे. दरम्यान आता अमेरिका इराण यांच्यात सुरु असलेल्या चर्चेत सकारात्मक परिणाम समोर आल्यास युद्ध थांबू शकते. मात्र चर्चा फिस्कटल्यास युद्ध अधिक तिव्र होऊ शकते.





