मॉस्को : अमेरिका युक्रेनला लांब पल्ल्याची टॉम हॉक क्षेपणास्त्रे देण्याचा विचार करत आहे. या लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांमुळे युक्रेनला थेट रशियाची राजधानी मॉस्कोवर मारा करणे शक्य होणार आहे. मात्र टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांचा युक्रेनमधील युद्धभूमीवरील परिस्थितीवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी मंगळवारी सांगितले. युरोपातील आपल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिका युक्रेनला या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याबद्दलच्या बातम्या पसरवत असेल, असे देखील ते म्हणाले. जरी युक्रेनमध्ये टॉम हॉक्स क्षेपणास्त्रे तैनात केली गेली तरी, यामुळे आघाडीच्या परिस्थितीत बदल होणार नाही, असे रशियाने आधीच स्पष्टपणे सांगितले आहे. उलट युक्रेनला लष्करी मदत करणाऱ्या देशांना या मदतीची किंमतच मोजायला लागेल, असा धमकीवजा इशाराही रशियाने युरोप आणि अमेरिकेला दिला आहे. रशियाच्या आत खोलवर लांब पल्ल्याचे हल्ले करण्याची क्षमता असलेल्या टॉम हॉक क्षेपणास्त्रांच्या तैनातीबद्दल युक्रेनच्या नेतृत्वाने केलेले विधान केवळ नकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहिले जाऊ शकते, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी मंगळवारी मॉस्कोमध्ये पत्रकारांना सांगितले. युक्रेनचा लष्करी पराभव अपरिहार्य आहे. त्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांच्या राजवटीकडून युरोपचा वापर केला जातो आहे. झेलेन्स्की यांच्यामुळे मोठे युद्ध भडकण्याचा धोका पत्करूनही युरोपातील देश काही टोकाचे उपाय करत आहे, असा इशारा रशियाच्या परराष्ट्र गुप्तचर सेवेने दिला आहे. रशियाची ड्रोन पोलंड आणि रोमानियामध्ये घुसल्याचे भासवून युक्रेन युरोपातील देशांना भडकावत आहे. त्यामुळेच नाटो सदस्य देश रशियाविरोधात आक्रमक होत असल्याचेही ते म्हणाले.