US policy: अमेरिकेच्या धोरणाचा सर्वावर परिणाम; आशियाई विकास बँकेच्या अहवालातील माहिती

नवी दिल्ली – अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या सरकारच्या धोरणामुळे भारतासह आशिया खंडातील इतर देशावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. या देशातील महागाई वाढू शकते व विकास दर मंदावू शकतात असे आशियाई विकास बँकेने आपल्या नव्या अंदाज अहवालात नमूद केले आहे.
अमेरिकेच्या व्यापारी, आर्थिक आणि परकीय नागरिकांच्या संबंधातील धोरणात मोठा बदल होणार आहे. त्या प्रकारची शक्यता ट्रम्प यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. याचा सर्वच विकसनशील देशावर परिणाम होऊ शकतो असे या बँकेचे म्हणणे आहे.
या बँकेने या अगोदर भारताचा विकासदर यावर्षी सात टक्के राहण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र बदललेल्या परिस्थितीमुळे आता भारताचा विकासदर 6.5% राहील असे या बँकेने म्हटले आहे. पुढील वर्षी भारताचा विकासदर 7.2% राहील असे या बँकेने म्हटले होते. मात्र आता या अंदाजात बदल करून हा विकासदर 7% राहील असे सांगितले आहे.
बदललेल्या परिस्थितीच्या आधारावर सर्वच मूल्यांकन करणार्या संस्थांनी भारताचा विकासदर कमी होऊन महागाई वाढणार असल्याचे नमूद केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने चालू वर्षात भारताचा विकास दर 7.2% वरून कमी करून 6.6% इतका होईल असे म्हटले होते. त्याचबरोबर अगोदर रिझर्व्ह बँकेने महागाईचा वार्षिक सर्वसाधारण 4.5% राहील असे म्हटले होते.
मात्र नव्या अंदाजानुसार महागाई 4.8% वर राहील असे म्हटले आहे. अमेरिकेचे नकारात्मक धोरण आणि दोन युद्धामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवरही परिणाम शक्य आहे. याकडेवारीचा भारताच्या महागाईच्या आकडेवारीवर आणि राष्ट्रीय उत्पन्नच्या आकडेवारीवर परिणाम शक्य आहे.

