मुंबई – अमेरिकेने परदेशी कर्मचार्यांना अमेरिकेत येणे जास्त खर्चिक केल्यामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या निर्यातीवर परिणाम होऊन परकीय चलनाची आवक कमी होणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय शेअर बाजार आणि रुपयाच्या मूल्यावर दबाव कायम आहे. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल 47 पैशांनी कोसळून रुपयाचा भाव 88.75 रुपये प्रति डॉलर या ऐतिहासिक निचांकी पातळीवर गेला. चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या या निर्णयामुळे केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावरच नाही तर भारतात होणार्या थेट परकीय गुंतवणुकीवर किमान लघु पल्ल्यात तरी नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डॉलरची मागणी वाढत आहे.त्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत आहे. शेअर बाजार निर्देशांक कोसळत असल्यामुळेही रुपयाच्या मूल्यावर दबाव येत आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात विक्री चालूच असून सोमवारी या गुंतवणूकदारानी 2,910 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. काही विश्लेषकांनी सांगितले की, रुपयाचा भाव आणखी कोसळला असता मात्र दरम्यानच्या काळामध्ये खनिज तेलाचे दर माफक पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत भारताला खनिज तेल आयातीसाठी जास्त डॉलर खर्च करावे लागणार नाहीत. काल आणि आज रुपयाचा दर संतुलित ठेवण्यासाठी रिझर्व बँकेने हस्तक्षेप केला असण्याची शक्यता आहे. मात्र तरीही रुपयाचा दर काल आणि आज बर्याच प्रमाणात कमी झाला. डॉलर इंडेक्स सध्या माफक म्हणजे 97.28 अंकावर आहे. तरीही रुपयाच्या मूल्यावर याचा दबाव येत आहे. त्यामुळे रुपयाला सावरण्यासाठी आगामी काळात परकीय चलन संवर्धनाची मोठी मोहीम रिझर्व बँकेला आणि अर्थ मंत्रालयाला हाती घ्यावी लागणार असल्याचे दिसून येते. भारताकडे पुरेसे परकीय चलन – गेल्या आठवड्यात रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार भारताकडे 702 अब्ज डॉलर इतके परकीय चलन आहे. भारताला जवळजवळ दीड वर्ष आयातीला पुरेल एवढे हे चलन आहे. मात्र तरीही भारत सरकार निर्यात वाढवून परकीय चलन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी अनेक देशांबरोबर मुक्त व्यापार करार करण्यात येत आहे. मात्र अमेरिकेने भारतीय आयातीबाबत नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे रुपयाला आधार मिळत नसल्याचे दिसून येते.