US Open 2024 : ओसाकाचे आव्हान संपुष्टात; सिनर, स्विटेक तिसऱ्या फेरीत दाखल…

US Open 2024 : जागतिक क्रमावरची तिसऱ्या स्थानावर असलेल्या कार्लोस अल्काराझ यूएस ओपन स्पर्धेत त्याला 74 व्या मानांकित बोटिक व्हॅन डी झांडस्चल्पकडून पराभूत व्हावे लागल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. महिला एकेरीत जपानच्या नाओमी ओसाकाला देखील झेकियाच्या कॅरोलिना मुचोवाने दुसऱ्याच फेरीत पराभूत केले.
जपानच्या नाओमी ओसाकाने पहिल्या फेरीत शानदार कामगिरी करताना विजय साकारला होता. मात्र आज दुसऱ्या फेरीत तिला झेकियाच्या कॅरोलिना मुचोवाकडून 6-3, 7-6 असा पराभवाचा सामना करावा लागला. कॅरोलिनाने जबरदस्त खेळ करताना पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. त्यानंतर मात्र नाओमीने आपल्या चुका दुरुस्त करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या सेटमध्ये अधिक चांगला खेळ करताना ओसाकाने कॅरोलिनाला टायब्रेकरमध्ये पकडले. यावेळी गुण मिळविण्यासाठी ओसाकाने तब्बल 119 किमी गतीने फटका मारला. मात्र, मोक्याच्या क्षणी झालेल्या चुका तिला टाळता आल्या नाहीत. कॅरोलिनाने याच चुका टाळल्या व सामन्यात विजय साकारला.
सिनर, स्विटेक यांची आगेकूच
इटलीच्या अग्रमानांकित जॅनिक सिनरने अमेरिकेचा अलेक्स मिशेलसेनला 6-4, 6-0, 6-2 असे एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या फेरीत सिनरसमोर ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस्तोफर ओ’कॉनेलचे आव्हान असणार आहे. महिला गटात पोलंडच्या इगा स्विटेकने जपानच्या एना शिबाहाराला 6-1, 6-0 असे पराभूत केले. या विजयाने इगाने स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला असून या फेरीत तिच्या समोर रशियाच्या अनास्तासिया पावल्युचेन्कोवाचे आव्हान असणार आहे.





