अमेरिकन लष्कराचे सीरिया, इराकवर हवाई हल्ले !

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या लष्कराने सीरिया आणि इराकवर जोरदार हवाई हल्ले केल्याचे वृत्त आहे. इराण पुरस्कृत दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर हे हल्ले करण्यात आले.
इराक आणि सीरियाच्या सीमेवर हे अड्डे आहेत. तेथेच हे हल्ले करण्यात आले. अमेरिकन लष्कराने यावेळी मानवरहित विमानांचा वापर करून केला असे अमेरिकेचे प्रेस सेक्रेटरी जॉन किरबाय यांनी सांगितले.
ते म्हणाले की, इराकच्या हद्दीत एक आणि सीरियाच्या हद्दीत दोन ठिकाणी या दहशतवाद्यांनी जो शस्त्रसाठा केला होता तो आम्ही हे हल्ले करून उडवला. इराणचे समर्थन लाभलेल्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आम्ही हे हल्ले केले.
त्याचे स्वरूप बचावात्मक हल्ला असे होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. या दहशतवाद्यांना अतिशय स्पष्ट आणि कृतीशील संदेश देणे ही आमची या मागची भूमिका होती, असे त्यांनी म्हटले आहे. या भागात अध्यक्ष बायडेन यांनी त्यांच्या कारकिर्दीत या भागात केलेला हा दुसरा हल्ला आहे. या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रालाही हा इशारा आहे, असे पेंटॅगॉनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.





