US Military Plane Missing : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकन हवाई दलाचे ‘बोइंग KC-135 स्ट्रॅटोटँकर’ (Boeing KC-135 Stratotanker) हे लष्करी विमान इराणच्या किनारपट्टीजवळ पर्शियन आखातावरून उड्डाण करत असताना बेपत्ता झाले आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता होण्यापूर्वी या विमानाने ‘७७००’ हा आपत्कालीन सिग्नल (Squawk 7000) जारी केला होता, जो विमानातील तांत्रिक बिघाड किंवा संकटाचे संकेत देतो. ‘फ्लाईट ट्रॅकिंग’मध्ये काय आढळले? ‘फ्लाईट राडार २४’ च्या आकडेवारीनुसार, या विमानाने संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) अल धाफरा विमानतळावरून उड्डाण केले होते. कतारच्या हवाई हद्दीत पोहोचल्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला. रडार डेटा दर्शवतो की, बेपत्ता होण्यापूर्वी हे विमान काही काळ हवेत घिरट्या घालत होते. इराणच्या ‘फार्स’ या निमलष्करी वृत्तसंस्थेनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इराणची भूमिका आणि तणाव इराणने अद्याप या घटनेत आपला कोणताही सहभाग असल्याचा दावा केलेला नाही किंवा तसे संकेतही दिलेले नाहीत. दुसरीकडे, अमेरिकन लष्करानेही अद्याप या विमानाबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. यापूर्वी मार्च महिन्यात इराकच्या पश्चिम भागात इराण समर्थित गटाने अमेरिकेचे अशाच प्रकारचे एक विमान पाडल्याचा दावा केला होता. त्यामुळे सध्याच्या घटनेकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहिले जात आहे. काय आहे KC-135 ‘स्ट्रॅटोटँकर’? KC-135 स्ट्रॅटोटँकर हे केवळ विमान नसून ते अमेरिकन हवाई दलाचे ‘फ्लाईंग फ्युएल स्टेशन’ मानले जाते. या विमानाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. हवेतल्या हवेत लढाऊ विमाने आणि बॉम्बर विमानांमध्ये इंधन भरणे. यामुळे लष्करी विमाने अधिक काळ आणि जास्त अंतरापर्यंत मोहीम फत्ते करू शकतात. हे विमान सुमारे ३७,६०० किलोग्रॅम माल किंवा डझनभर प्रवाशांची वाहतूक करू शकते.आपत्कालीन परिस्थितीत जखमी सैनिकांना वाहून नेण्यासाठी (Aeromedical Evacuation) याचा वापर केला जातो. हे विमान चार शक्तिशाली टर्बोफॅन इंजिनांवर चालते आणि गेल्या ६० वर्षांपासून अमेरिकन हवाई दलाचा कणा राहिले आहे. दरम्यान, विमान बेपत्ता होण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पर्शियन आखातात शोधमोहीम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हा तांत्रिक बिघाड होता की शत्रूची कारवाई, यावर संरक्षण तज्ज्ञांचे लक्ष लागून आहे.